पेणमधील १८ गावे, ५२ वाड्यांमध्ये पाणीटंचाई
By Admin | Updated: February 3, 2015 23:07 IST2015-02-03T23:07:23+5:302015-02-03T23:07:23+5:30
वाशी व वडखळ भागातील १८ गावे, ५० वाड्यांमध्ये दरवर्षी भीषण पाणीटंचाई उद्भवते.

पेणमधील १८ गावे, ५२ वाड्यांमध्ये पाणीटंचाई
पेण : वाशी व वडखळ भागातील १८ गावे, ५० वाड्यांमध्ये दरवर्षी भीषण पाणीटंचाई उद्भवते. गेली दोन दशकांपासून समस्येवर प्रभावी उपाययोजना करण्यावर राज्य शासन व झेडपी प्रशासन अपयशी ठरलेले आहे. निवडणुकांच्या वेळी पाणीटंचाईवर भलीमोठी आश्वासने दिली जातात. मात्र, पाणी व्यवस्थापन व वितरण प्रणाली यांचा कधीच ताळमेळ बसविण्यात राज्यकर्ते व स्थानिक लोकप्रतिनिधींना आजपर्यंत यश आलेले नाही.
यंदाही पेण पंचायत समितीने १८ गावे, ५० वाड्यांवर पाणीटंचाई निवारणार्थ व पाणीसंचय उपाययोजनांसाठी ९५ लाख ४० हजार रुपयांचा टंचाई कृती आराखड्यास मंजुरी दिली आहे. वाशी खारेपाटातील २६ गावे, ६३ वाड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या जिल्हा परिषदेचे शहापाडा धरणातील पाणीसाठा संपला आहे. सध्या वाशी-वडखळ, शिर्की-मसद या खारेपाटातील जनता पाण्यासाठी वणवण करताना दिसत आहे. ही समस्याच एवढी भीषण आहे की, शहरात रोजंदारीसाठी येणारे गावकरी सायंकाळी जाताना पाण्याचे बॅरल भरुन नेताना दिसतात. पेण पंचायत समितीच्या मासिक सभेत २०१५-१६ च्या टंचाईनिवारणार्थ कृती आराखड्याला मंजुरी देण्यात आली. गतवर्षी १ कोटी १६ लाखांचा कृती आराखडा यावर्षी ९५ लाख ४० हजारांचा केला आहे.
टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ४३ लाख ५० हजार, नळपाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती १५ लाख, बोअरवेलसाठी १६ लाख तर तात्पुरता पूरक पाणीपुरवठा योजनेवर २० लाखांची तरतूद केली आहे. यामध्ये वढाव येथे पंप बसविण्यासाठी १० लाख तर कॅनॉल पाइपलाइन व पंपासाठी १० लाख अशी तरतूद केली आहे. यावर्षी फेबु्रवारीच्या प्रारंभीच २ खाजगी टँकर उपलब्ध झाले असून टंचाईग्रस्त मसद ग्रा.पं.मधील ३ गावे ५ वाड्यांचे प्रस्ताव आल्याचे पंचायत समितीच्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्या सूत्रांनी माहिती दिली.
शहापाडा धरणातील पाणीसाठा संपल्याने आता हेटवणे सिडको मुख्य जलवाहिनीतून उत्तर शहापाडा योजनेतील गावांना पाणीपुरवठा करण्यात येणार असून तो कमी दाबाने असण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)
टंचाईनिवारणार्थ कृती
४ पेण पंचायत समितीच्या मासिक सभेत २०१५-१६ च्या टंचाईनिवारणार्थ कृती आराखड्याला मंजुरी देण्यात आली. गतवर्षी १ कोटी १६ लाखांचा कृती आराखडा यावर्षी ९५ लाख ४० हजारांचा करण्यात आला आहे.
४टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ४३ लाख ५० हजार, नळपाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती १५ लाख, बोअरवेलसाठी १६ लाख तर तात्पुरता पूरक पाणीपुरवठा योजनेवर २० लाखांची तरतूद केली.