१८ घुसखोरांना बाहेरचा रस्ता

By Admin | Updated: May 30, 2015 00:24 IST2015-05-30T00:24:35+5:302015-05-30T00:24:35+5:30

म्हाडाच्या धारावी संक्रमण शिबिरातील घुसखोरीवर नुकताच ‘लोकमत’ रिअ‍ॅलिटी चेकद्वारे प्रकाश टाकल्यानंतर म्हाडाने बुधवारी घुसखोरांवर धडक कारवाई सुरू केली आहे.

18 road outside intruders | १८ घुसखोरांना बाहेरचा रस्ता

१८ घुसखोरांना बाहेरचा रस्ता

मुंबई : म्हाडाच्या धारावी संक्रमण शिबिरातील घुसखोरीवर नुकताच ‘लोकमत’ रिअ‍ॅलिटी चेकद्वारे प्रकाश टाकल्यानंतर म्हाडाने बुधवारी घुसखोरांवर धडक कारवाई सुरू केली आहे. येथील १८ घुसखोरांना संक्रमण शिबिराबाहेरचा रस्ता दाखवल्याचे म्हाडा अधिकाऱ्यांनी सांगितले.
स्थानिक पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. याआधी म्हाडा संक्रमण शिबिरातील निवासी गाळे सर्रासपणे भाड्याने देणे आणि विकण्याचे प्रकार सुरू असल्याचे ‘लोकमत’ने उघडकीस आणले होते. त्यानंतर म्हाडाचे मुख्य अधिकारी सुभाष लाखे यांनी दोन दिवसांत घुसखोरांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर बुधवारी म्हाडाने १८ घुसखोरांवर कारवाई केली आहे.
या प्रकरणी अधिक माहिती देताना म्हाडाने सांगितले की, तत्काळ १८ जणांना निष्कासित केले असले, तरी लवकरच इतर घुसखोरांवरही कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी भाडे वसूल करणाऱ्या अधिकाऱ्यांना संक्रमण शिबिराचा सर्व्हे करण्याचे आदेश दिले आहेत.
या सर्व्हेमध्ये घुसखोरीची जी प्रकरणे समोर येतील, त्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांनाही बाहेरचा रस्ता दाखवण्यात येईल. तरी अधिकाधिक नागरिकांनी तक्रार करण्याचे आवाहन म्हाडाने केले आहे. (प्रतिनिधी)

च्मुंबई म्हाडाच्या ५६ संक्रमण शिबिरांत २१ हजार १३५ गाळे आहेत.
च्जुलै २०१३ अखेर आढावा घेतला असता त्यापैकी ८ हजार ४४८ गाळ्यांमध्ये घुसखोरी झाल्याचे निदर्शनास आले.
च्धारावी संक्रमण शिबिरामध्ये सुमारे २ हजार निवासी गाळे आहेत.

अधिकाऱ्यांची वानवा
धारावी संक्रमण शिबिरातील २ हजार निवासी गाळ्यांचे भाडे वसूल करण्यासाठी केवळ एकच अधिकारी आहे. जमा केलेले भाडे भरण्याचे कामही याच अधिकाऱ्याला करावे लागते. त्यात संक्रमण शिबिरांची देखरेख करण्यासाठी एकही सुरक्षारक्षक नाही. परिणामी घुसखोरांवर नजर ठेवणे कठीण झाल्याचे म्हाडातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: 18 road outside intruders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.