Join us  

रेल्वेतील चोरीच्या १७७ तक्रारींचेच झाले निवारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2019 2:19 AM

मध्य रेल्वे मार्गावर मागील तीन महिन्यांत सुमारे ५ हजार ९०८ चोरीच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. यापैकी फक्त १७७ तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे.

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर मागील तीन महिन्यांत सुमारे ५ हजार ९०८ चोरीच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. यापैकी फक्त १७७ तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे.

मध्य रेल्वे मार्गावर जानेवारी २०१९ मध्ये चोरीच्या २ हजार १४० गुन्ह्यांची नोंद झाली असून यापैकी ४७ तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये एकूण १ हजार ९४७ गुन्ह्यांची नोंद झाली असून यापैकी ६० तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. तर मार्च २०१९ मध्ये दाखल झालेल्या १ हजार ८२१ तक्रारींपैकी ७० तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे.

मध्य रेल्वे मार्गावर मागील दोन वर्षांत मौल्यवान वस्तू, प्रवासी साहित्य, मोबाइल, बॅग आणि पाकीट अशा वस्तू चोरीला जाण्याची संख्या वाढली असून जानेवारी २०१७ ते डिसेंबर २०१८ या दोन वर्षांत एकूण ३७ हजार ३०२ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. तर, जानेवारी ते मार्च २०१९ या तीन महिन्यांत एकूण ५ हजार ९०८ गुन्हे दाखल झाले आहेत.

जानेवारी ते डिसेंबर २०१८ मधील २२ हजार ५२५ गुन्ह्यांपैकी ६५५ गुन्ह्यांचा तपास करण्यात आला असून ७५२ जणांना पकडण्यात आले. जानेवारी ते डिसेंबर २०१७ मधील १४ हजार ७७७ गुन्ह्यांपैकी ८६४ गुन्ह्यांचा तपास लावण्यात आला असून ९९७ जणांना पकडण्यात आले. तर जानेवारी ते मार्च २०१९ या महिन्यांत दाखल ५ हजार ९०८ गुन्ह्यांपैकी १७७ गुन्ह्यांचा तपास लावण्यात आला आहे. जानेवारी ते फेब्रुवारी २०१९ या महिन्यांत ५६ जणांना पकडण्यात आले आहे.

मध्य रेल्वे मार्गावरील चोरीच्या घटना रोखण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाकडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. सकाळ आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळी महाराष्ट्र सुरक्षा बल आणि रेल्वे लोहमार्ग पोलीस यांच्या सहकार्याने तपासणी, स्थानकावर गस्त घालण्यात येते. विशेष डिटेक्शन स्क्वॉडही तैनात करण्यात आले आहे.

यामध्ये २४ जणांची टीम आहे. या टीमद्वारे प्रत्येक घटना-घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवून चोरांना रंगेहाथ अटक करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :रेल्वेचोरी