कळवा रुग्णालयात डायलिसीससाठी रुग्णाकडून १७ हजार उकळले
By Admin | Updated: December 23, 2014 23:12 IST2014-12-23T23:12:15+5:302014-12-23T23:12:15+5:30
कळवा रुग्णालयात सुरु असलेल्या डायलिसीस सेंटरमध्ये पहिल्या डायलिसीससाठी तब्बल १७ हजार रुपये घेतले जात असल्याचा आरोप

कळवा रुग्णालयात डायलिसीससाठी रुग्णाकडून १७ हजार उकळले
ठाणे - कळवा रुग्णालयात सुरु असलेल्या डायलिसीस सेंटरमध्ये पहिल्या डायलिसीससाठी तब्बल १७ हजार रुपये घेतले जात असल्याचा आरोप मंगळवारी झालेल्या महासभेस सदस्यांनी केला. या संदर्भातील पुरावेदेखील यावेळी प्रशासनापुढे सादर करण्यात आले. त्यानुसार आता या सेंटरची चौकशी करुनअहवाल तयार करण्यास सांगून करारानुसार संबधींत संस्थेने काम केले नसेल तर त्याचा करारही रद्द करण्याचे आदेश पिठासिन अधिकारी महापौर संजय मोरे यांनी प्रशासनाला दिले़
कळवा रुग्णालया संदर्भातील विषयावर मंगळवारी महासभेत चर्चा सुरु होती. यावेळी सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी येथील डायलिसीस सेंटरच्या मुद्याला हात घातला. एका रुग्णाकडून या संस्थेने पहिल्या डायलेसीससाठी १७ हजार मागितल्याचा आरोप त्यांनी केला. त्यानुसार रुग्णाने सुरवातीला ८५०० रुपये जमा केले. त्यानंतर उर्वरित रक्कम भरणे शक्य नसल्याने त्याने या संदर्भात कळवा रुग्णालय प्रशासनाकडे तक्रारदेखील केली. परंतु प्रशासनाकडून अद्यापही कारवाई झाली नसल्याचेही त्यांनी सांगितले. प्रत्यक्षात पहिल्या डायलिसीससाठी १२०० रुपये घ्यावेत असे असतांनादेखील या संस्थेकडून रुग्णांची लूट सुरु असल्याचा आरोप सदस्यांनी केला. त्यामुळे या संस्थेचा करार रद्द करण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली. संबधींत रुग्णाकडून, पहिल्या नाही तर एक ते आठ डायलिसीससाठी ही रक्कम घेण्यात आली असल्याची माहिती कळवा रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी सुनील कोरडे यांनी दिली. परंतु, त्यांच्या उत्तरावरुन सदस्य आणखीनच आक्रमक झाले. पुरावे सादर केले गेल्यानंतरही अशा प्रकारे चुकीची उत्तरे देऊन डॉक्टर सभागृहाची दिशाभूल करीत असल्याचा आरोपही सदस्यांनी केला. कराराप्रमाणे दर आकारले जात नसून, दर वाढवायचे झाल्यास त्याला प्रशासनाची मंजूरी घ्यावी लागते, तशी कोणतीही मंजूरी घेतली नसल्याचा आरोप नजीब मुल्ला यांनी केला.
या संस्थेचा १५ वर्षांसाठी करार झाला असून सुरुवातीला ओपीडीसाठी ३०० रुपये आणि डायलिसीससाठी ६५० रुपये आकारले जात होते. परंतु दरवर्षी १० टक्के वाढ करण्याची मुभा असल्याने आता पहिल्या डायलिसीससाठी २४०० रुपये आकारले जात असल्याची माहिती आयुक्त असीम गुप्ता यांनी दिली. परंतु ही दरवाढ करतांना प्रशासनाची कोणताही परवानगी घेतली नसल्याचेही त्यांनी मान्य केले. (प्रतिनिधी)