Join us  

BARC च्या वैज्ञानिकाचा मुलगा बेपत्ता, नैराश्यामुळे सोडलं घर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 11:43 AM

मुंबईतील भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्रातील (बीएआरसी) वैज्ञानिकाचा अल्पवयीन मुलगा काही दिवसांपासून बेपत्ता आहे.

मुंबई - मुंबईतील भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्रातील (बीएआरसी) वैज्ञानिकाचा अल्पवयीन मुलगा काही दिवसांपासून बेपत्ता आहे. नमन दत्त असं या  17 वर्षीय मुलाचं नाव असून तो 23 सप्टेंबरपासून बेपत्ता झाल्याचं सांगण्यात येत आहे. अभ्यासाचा ताण आणि नैराश्याने नमन ग्रासला होता. त्यामुळेच तो घरातून निघून गेला असावा असे दत्त कुटुंबीयांचे म्हणणे आहे. बेपत्ता नमनचा अजून काही तपास लागला नसल्याने त्याच्या आई-वडिलांनी आता चिंता व्यक्त केली आहे.

23 सप्टेंबर रोजी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास नमन त्याच्या वाशी येथील घरातून बाहेर पडला. त्यानंतर त्याने सीएसएमटीकडे जाणारी ट्रेन पकडली. पोलिसांनी त्याचे कॉल रेकॉर्ड तपासून त्याला शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र त्याला शोधण्यात पोलिसांना अद्याप यश आलेलं नाही. 

घरातील एका व्यक्तीच्या निधनामुळे नमनला जबरदस्त मानसिक धक्का बसला असल्याची माहिती त्याची आई चंद्रा राममुर्ती यांनी दिली आहे. तसेच त्याच्यावर अभ्यासाचा ताणही होता. नैराश्यात गेलेल्या नमनवर काही दिवसांपासून उपचारही सुरू असल्याचं ही त्यांनी सांगितलं. बेपत्ता असलेला नमन अद्याप घरी परतला नसल्याने त्याचे कुटुंबीय चिंतेत आहेत.

 

टॅग्स :मुंबईपोलिस