१७ मजले जळून खाक!
By Admin | Updated: January 18, 2015 01:45 IST2015-01-18T01:45:27+5:302015-01-18T01:45:27+5:30
मालाड पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळील बांधकाम सुरू असलेल्या ओमकार अपार्टमेंटला शुक्रवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत १७ मजले जळून खाक झाल्याची घटना घडली.

१७ मजले जळून खाक!
मुंबई : मालाड पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळील बांधकाम सुरू असलेल्या ओमकार अपार्टमेंटला शुक्रवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत १७ मजले जळून खाक झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत मनुष्यहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे.
ओमकर रिलेटर्स अॅन्ड डेव्हलपर्स या बांधकाम व्यावसायिकाने ही इमारत बांधण्याचे काम हाती घेतले असून, लार्सन अॅन्ड टुब्रो या ४० मजली इमारतीचे बांधकाम करीत आहे. शुक्रवारी रात्री बांधकाम सुरू असलेल्या या इमारतीच्या २३ व्या मजल्यावर आग लागली. कालांतराने ही आग खालच्या मजल्यावर पसरू लागली. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे १० बंब, ५ जेसीबी आणि २ रुग्णवाहिका दाखल झाल्या. इमारत उंच असल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना अथक प्रयत्न करावे लागले. दरम्यान, पोलिसांनी प्रसंगावधान राखत इमारतीलगतचा परिसर निर्मनुष्य केला. सहा तासांच्या अथक प्रयत्नांती अग्निशमन दलाच्या जवानांनी या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. मात्र तोवर इमारतीचे १७ मजले जळून खाक झाले होते. दरम्यान, आगीमागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. शिवाय या प्रकरणात कोणावरही गुन्हा नोंदविलेला नाही. ( प्रतिनिधी)
तब्बल चार तासांचे बचावकार्य
अंधेरी कुर्ला रोड येथील न्यू तेजपाल इंड्रस्ट्रीजमधील गारमेंटच्या गाळ्याने शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास पेट घेतला.
आगीचे स्वरूप भीषण असल्याने अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
तब्बल चार तासांच्या बचावकार्यानंतर दुपारी साडेतीनच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यास अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.
या दुर्घटनेत सुदैवाने मनुष्यहानी झाली नसून, वित्तहानी मात्र मोठ्या प्रमाणावर झाली आहे. आगीमागचे नेमके कारण समजू शकले नसून, याप्रकरणी साकीनाका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.