मोतीलाल नगरच्या रहिवाशांना १६०० फुटांचे घर; अदाणी समूहासोबत करारावर स्वाक्षरी

By सचिन लुंगसे | Updated: July 7, 2025 20:51 IST2025-07-07T20:51:33+5:302025-07-07T20:51:33+5:30

अदाणी समूह यांच्यात मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सोमवारी करार करण्यात आला. 

1600 ft house for Motilal Nagar residents agreement was signed on Monday with the Adani Group | मोतीलाल नगरच्या रहिवाशांना १६०० फुटांचे घर; अदाणी समूहासोबत करारावर स्वाक्षरी

मोतीलाल नगरच्या रहिवाशांना १६०० फुटांचे घर; अदाणी समूहासोबत करारावर स्वाक्षरी

मुंबई :  गोरेगाव (पश्चिम) येथील मोतीलाल नगर १, २ व ३ या म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकास प्रकल्पाला आज गती मिळाली असून महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) आणि कन्स्ट्रकशन अँड डेवलपमेंट एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आलेल्या अदाणी समूह यांच्यात मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सोमवारी करार करण्यात आला. 

म्हाडा मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, अदाणी प्रॉपर्टीज प्रायवेट लिमिटेडचे संचालक प्रणव अदाणी आदी उपस्थित होते. संजीव जयस्वाल म्हणाले की, मोतीलाल नगरच्या रहिवाशांनी जे स्वप्न अनेक वर्षे उराशी बाळगले, त्याची मूर्त रुपरेषा आता प्रत्यक्षात येत आहे. देशातील सर्वोत्तम पुनर्विकास प्रकल्प या माध्यमातून राबविण्याचे व म्हाडा या प्रकल्पाच्या अंमलबजावणीत पारदर्शकता, गुणवत्ता आणि सामाजिक बांधिलकी जपून पुढे जाईल. पुनर्विकासाचे स्वप्न आता केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरणार आहे. पुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून रहिवाशांना अत्याधुनिक, सुरक्षित व सुसज्ज घरे प्रदान करण्याच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल म्हाडातर्फे उचलण्यात आले आहे.

१४२ एकर जागेवरील मोतीलाल नगर या म्हाडा वसाहतीची व्याप्ती लक्षात घेता कन्स्ट्रकशन अँड डेवलपमेंट पद्धतीने राबविण्यात येणारा देशातील पुनर्विकासाचा सर्वात मोठा प्रकल्प आहे.  या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे 'म्हाडा'तर्फे येथील रहिवाशांना १६०० चौरस फुटांच्या अत्याधुनिक सदनिकेमध्ये मोफत पुनर्वसन होणार आहे. सदर पुनर्विकास प्रकल्पातून म्हाडाला ०३ लाख ९७ हजार १०० चौरस मीटर क्षेत्र विकासकाकडून बांधून मिळणार आहे. या माध्यमातून नजीकच्या भविष्यात 'म्हाडा'कडे मोठ्या प्रमाणात अतिरिक्त गृहसाठा उपलब्ध होणार आहे.

बांधकाम व विकास संस्थेमार्फत मोतीलाल नगरचा पुनर्विकास करण्याची परवानगी म्हाडाला शासनाकडून प्राप्त झाली. राज्य शासनाने या प्रकल्पाला 'विशेष प्रकल्प' म्हणून मान्यता देऊन म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे हा प्रकल्प राबविण्याचे शासन निर्णयाद्वारे निर्देशित केले. मुंबई उच्च न्यायालयाने म्हाडाला कन्स्ट्रकशन अँड डेवलपमेंट एजन्सीच्या माध्यमातून हा पुनर्विकास करायला परवानगी दिली. त्यानंतर मोतीलाल नगर वसाहतीचा पुनर्विकासासाठी मुंबई मंडळातर्फे कन्स्ट्रकशन अँड डेवलपमेंट एजन्सी नियुक्त करण्यासाठी निविदा मागविण्यात आली. सदर निविदा अदानी समूहाला मिळाली आहे. 

मोतीलाल नगर १,२ व ३ मध्ये ३७०० गाळे असून तेथील रहिवाशांचे पुनर्वसन साधारणपणे ०५ लाख ८४ हजार १०० चौरस मीटर जागेवर करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त अनिवासी गाळेधारकांना ९८७ चौरस मीटर चौरस फुटांचे व्यावसायिक गाळे दिले जाणार आहेत. या पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन सदनिकांचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी सात वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. सदर प्रकल्प हा देशातील सर्वात मोठा पुनर्विकास प्रकल्प असून '१५ मिनिटांचे शहर' या संकल्पनेवर आधारित आहे. या संकल्पनेद्वारे या प्रकल्पातील घरांपासून कार्यालय, सार्वजनिक परिवहन सेवा, मेट्रो स्टेशन, उद्यान, मनोरंजन ठिकाण, शाळा, हॉस्पिटल १५ मिनिटांच्या अंतरावर असणार आहे.

पाच एकरचे मध्यवर्ती उद्यान हे या प्रकल्पातील वैशिष्ट्य आहे. रहिवाशांना पुनर्विकासात प्रथम प्राधान्य दिले जाणार असून या प्रकल्पात वाहतूक व्यवस्थेचे उत्तम नियोजन करण्यात आले आहे. अदाणी समूहाने मोतीलालनगरचा आराखडा बनवण्यासाठी आंतरराष्ट्रीय सल्लागारांची मदत घेतली आहे. मॅकेनो या नेदरलंडस्थित जगतविख्यात आर्किटेक्चर फर्मने मोतीलाल नगरचा बृहत आराखडा तयार केला आहे. ब्युरो हॅप्पोल्ड ही पायाभूत सुविधा क्षेत्रांतील लंडनस्थित सल्लागार सेवा देणारी संस्था असून या संस्थेने मोतीलाल नगरचा पायाभूत सुविधांचा आराखडा तयार केला आहे. या प्रकल्पातील पुनर्वसन निवासी सदनिकांच्या इमारतींवर सोलार पॅनल बसविले जाणार आहेत.

Web Title: 1600 ft house for Motilal Nagar residents agreement was signed on Monday with the Adani Group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.