१५ फेब्रुवारी रोजी रिक्षाचालकांचा संप
By Admin | Updated: February 3, 2016 03:18 IST2016-02-03T03:18:48+5:302016-02-03T03:18:48+5:30
ओला, उबर, टॅक्सी फॉर शुअरसारख्या अवैध कंपन्यांवर बंदी घालणे, अवैध प्रवासी वाहतुकीवर निर्बंध यावेत यासह अन्य मागण्यांसाठी मुंबई आॅटोरिक्षा-टॅक्सीमेन्स युनियनने १५ फेब्रुवारी रोजी

१५ फेब्रुवारी रोजी रिक्षाचालकांचा संप
मुंबई : ओला, उबर, टॅक्सी फॉर शुअरसारख्या अवैध कंपन्यांवर बंदी घालणे, अवैध प्रवासी वाहतुकीवर निर्बंध यावेत यासह अन्य मागण्यांसाठी मुंबई आॅटोरिक्षा-टॅक्सीमेन्स युनियनने १५ फेब्रुवारी रोजी आॅटोरिक्षा न चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनात जवळपास १ लाखापैकी ८३ हजार रिक्षा सामील होणार असल्याचा दावा युनियनकडून करण्यात आला आहे.
आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबई आॅटोरिक्षा-टॅक्सीमेन्स युनियनकडून १९ जानेवारी रोजी वांद्रे येथील परिवहन आयुक्त कार्यालयावर एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले होते. परंतु शासनाने ठोस निर्णय घेतला नाही. अवैध प्रवासी वाहतुकीवर निर्बंध आणण्यात शासन अपयशी ठरत असल्याचा आरोप युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी केला. मुंबईच्या पूर्व व पश्चिम उपनगरांतून राजरोसपणे परिवहन आणि वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने खासगी टुरिस्ट वाहनांमधून बेकायदेशीर प्रवासी वाहतूक बिनदिक्कतपणे सुरू आहे. त्याचप्रमाणे ओला, उबर, टॅक्सी फॉर शुअरसारख्या कंपन्या टॅक्सीमधून अवैधपणे प्रवासी वाहतूक करीत आहेत. त्यावर शासनाकडून कोणतेही निर्बंध घालण्यात आलेले नाहीत. त्यामुळे रिक्षा व्यवसायावर गदा येत असून, या एक दिवस आॅटोरिक्षा न चालविण्याचा निर्णय घेतल्याचे राव यांनी सांगितले. १५ फेब्रुवारी रोजी वांद्रे येथील परिवहन आयुक्त मुख्यालय तसेच पूर्व, पश्चिम उपनगरातील वाहतूक पोलीस व आरटीओसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)