पाणीपुरवठा योजनेसाठी १५.५६ कोटींना मंजुरी
By Admin | Updated: August 29, 2014 00:23 IST2014-08-29T00:23:32+5:302014-08-29T00:23:32+5:30
जव्हार शहराला पाणीपुरवठा करणारी पाणीपुरवठा योजना १९६० साली कार्यान्वित झाली होती.

पाणीपुरवठा योजनेसाठी १५.५६ कोटींना मंजुरी
जव्हार : जव्हार शहराला पाणीपुरवठा करणारी पाणीपुरवठा योजना १९६० साली कार्यान्वित झाली होती. जव्हारचे संस्थानिक राजे यशवंतराव महाराज यांच्या प्रयत्नामुळे जयसागर डॅम बांधून ते पाणी सदानंद जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध करून त्याचा पुरवठा नागरीकांना आजही केला जातो. परंतु १९६० च्या तुलनेत आज जव्हारची लोकसंख्या ७ ते ८ पटीने वाढल्याने वर्षभर पाणीपुरवठा नियमीत करणे अशक्य होते. नियमित दोन वेळा पाणीपुरवठा केल्यास मार्च महिन्यातच पाणी साठा संपून जाइल म्हणून अगोदरच नियोजन करून एक दिवसाआड पाणीपुरवठा केल्याने नागरिकांना पाणी प्रश्न भेडसावत असे.
भविष्यात जव्हारकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागू नये म्हणून जव्हारचे उपनगराध्यक्ष व नगराध्यक्ष यांनी तत्कालीन जलसंपदा मंत्री, जिल्हाधिकारी, पालघर जिल्हाधिकारी व जलसंपदा विभागाकडे सतत पाठपुरावा करून जव्हार शहरालगत बांधण्यात आलेल्या खडखड येथील मोठ्या धरणातून शहराला पाणीपुरवठा करण्यात यावा व या नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी निधी उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्न केले. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश येवून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानाअंतर्गत शासनाने १५.५६ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर केली. योजनेचा प्रस्ताव मंजुरीसाठी निकषानुसार पाणीपट्टीचा दर रू. ३२५ दरमहा आकारणेचा ठरावासह प्रस्ताव पुन्हा नगरपरिषद प्रशासन संचालनालयाकडे सादर करण्याचा ठराव २८ आॅगस्टच्या तातडीच्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
सर्वसाधारण सभेनंतर उपनगराध्यक्ष, नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी पत्रकार परिषदेत गेली अनेक वर्षे जव्हारकरांना वाढती लोकसंख्या, झपाट्याने होत असलेले शहरीकरण यामुळे पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. तसेच पाण्याची उपलब्धता नसल्याने अनेक उद्योजक जव्हार हे अनेक महत्वाच्या शहरांच्या मध्यवर्ती असल्याने इच्छा असूनही उद्योग करू शकत नसल्याचे औद्योगिकरणाला वाव नव्हता. परंतु नवीन पाणीपुरवठा योजनेमुळे एम.आय.डी. सी मंजूर करणे शक्य आहे. औद्योगिकरणामुळे सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील व नगरपरिषदेच्या उत्पन्नात देखील वाढ होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.