Join us

भारतीय कंपन्यांच्या ताफ्यात १५० नवी विमाने; तिकीटदरात दिलासा मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 10:24 IST

सर्वाधिक विमाने ही एअर इंडिया समूहाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. त्यांची संख्या ९२ इतकी आहे.

मुंबई : गेल्या काही महिन्यांत गो-फर्स्ट आणि इंडिगो या दोन विमान कंपन्यांची १०० पेक्षा जास्त विमाने तांत्रिक कारणांमुळे जमिनीवर स्थिरावली असली तरी आगामी वर्षभरात भारतीय विमान कंपन्यांच्या ताफ्यात तब्बल १५० नवी विमाने दाखल होणार आहेत. यामुळे, सध्या विमानाची संख्या कमी झाल्यामुळे तिकीट दरांत झालेली वाढ आटोक्यात येण्यास मदत होणार असल्याचे मानले जाते.

उपलब्ध माहितीनुसार, यापैकी सर्वाधिक विमाने ही एअर इंडिया समूहाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. त्यांची संख्या ९२ इतकी आहे. यापैकी ४२ विमाने एअर इंडिया या मुख्य कंपनीच्या ताफ्यात येतील तर उर्वरित विमाने एअर इंडियाची उपकंपनी असलेल्या एअर इंडिया एक्स्प्रेस कंपनीच्या ताफ्यात येतील. त्यापाठोपाठ इंडिगो विमान कंपनीच्या ताफ्यात ३५ नवी विमाने दाखल होतील. सध्या इंडिगो कंपनीकडे एकूण ३३४ विमाने आहेत. 

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सुरू झालेल्या अकासा कंपनीच्या ताफ्यात १८ नवीन विमाने दाखल होणार आहेत. कंपनीकडे २० विमाने आहेत. अलीकडेच कंपनीला आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी देखील अनुमती मिळाली आहे. या नव्या १५० विमानांमुळे प्रवासी वाहून नेण्याच्या क्षमतेमध्ये २५ टक्क्यांनी वाढ होणार आहे. २०२० च्या एका वर्षात भारतीय विमान कंपन्यांच्या ताफ्यात ७२ नवी विमाने दाखल झाली होती. त्यानंतर आता १२ महिन्यांच्या कालावधीमध्ये दाखल होणारी १५० नवी विमाने हा एक अलीकडच्या काळातील नवा उच्चांक ठरणार आहे.