Join us  

Coronavirus: 'त्या' विद्यार्थ्यांचे पेपर वेगळे काढा; शिक्षक, पर्यवेक्षकांमध्ये भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 11:26 PM

विद्यार्थ्यांच्या पेपर्सच्या माध्यमातून कोरोना पसरण्याची भीती

मुंबई: दक्षिण मुंबईतील एका केंद्रावर दहावीची परीक्षा देणाऱ्या १५ वर्षीय विद्यार्थ्याला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्या संपर्कात आलेले ३६ हून अधिक विद्यार्थी आणि शिक्षकांचा शोध आरोग्य विभाग व पोलिस घेत असून त्या विद्यार्थ्यांचे सगळेच पेपर वेगळे काढावेत अशी मागणी राज्य शिक्षण मंडळाकडे पर्यवेक्षकांकडून होत आहे. त्या विद्यार्थ्यांच्या पेपर्सच्या माध्यमातून कोरोना  पसरण्याची भीती शिक्षक व पर्यवेक्षकांमध्ये  पसरली आहे. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असूनही राज्यात दहावीची परीक्षा सुरू होती. दहावीचा सोमवारी होणारा अखेरचा पेपर मात्र पुढे ढकलण्यात आला. दक्षिण मुंबईतील एका नामांकित शाळेतील दहावीची परीक्षा देणारा एक विद्यार्थी कोरोना चाचणीत ‘पॉझिटिव्ह’ असल्याचे निदान झाले आहे. त्याच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कामाठीपुरा येथील रहिवासी असलेल्या या विद्यार्थ्याने शाळेपासून काही अंतरावरील केंद्रात दहावीची परीक्षा दिली. या केंद्रात ३५३ विद्यार्थी परीक्षा देत होते. एक वर्गात सुमारे २५ विद्यार्थ्यांची व्यवस्था होती. कस्तुरबा रुग्णालयात या विद्यार्थ्याची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचे नमुने ‘पॉझिटिव्ह’ आढळले. त्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने त्याच्यासोबत दहावीची परीक्षा दिलेल्या अन्य विद्यार्थ्यांची माहिती शिक्षण विभागाकडे मागितली. शिक्षण विभागाने त्या परीक्षा केंद्रातील अन्य विद्यार्थ्यांची माहिती दिली. त्यावरून आरोग्य विभागाने या विद्यार्थ्यांचा शोध सुरू केला आहे. परीक्षा केंद्र संचालकांनी आरोग्य विभाग आणि पोलिसांना तेथील अन्य विद्यार्थ्यांची माहिती दिली असून, पुढील कार्यवाही सुरू आहे. मात्र शिक्षण विभागाच्या बेजबाबदारपणामुळे ही वेळ आली असल्याची खंत शिक्षक व्यक्त करत आहेत. यामुळे शिक्षक आणि पर्यवेक्षक , इतर विद्यार्थ्यांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे. 

या विद्यार्थ्याने सही केले पेपर, त्याचे इतर विषयांचे पेपर, तसेच परीक्षा काळात त्याच्या संपर्कात आलेले शिक्षक व इतर विद्यार्थी यांची तपासणी करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणा मंडळाचे माजी सदस्य उदय नरे यांनी केली आहे. विद्यार्थी हा मंचाच आहे, त्याची काहीच चुकी नाही मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे तो कोरोनाच्या प्रसारास कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस