आयटीआयच्या दुसऱ्या फेरीत १५ हजार १७५ प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:07 IST2021-09-22T04:07:59+5:302021-09-22T04:07:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : आयटीआय प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीतील प्रवेशांना विद्यार्थ्यांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवेश निश्चितीच्या ...

आयटीआयच्या दुसऱ्या फेरीत १५ हजार १७५ प्रवेश
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आयटीआय प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीतील प्रवेशांना विद्यार्थ्यांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवेश निश्चितीच्या टक्केवारीवर परिणाम दिसून आला आहे. आयटीआय प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीमध्ये ६२ हजार ४३ विद्यार्थ्यांना अलॉटमेंट देण्यात आली होती. मात्र, प्रवेशाच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्यातील केवळ १५ हजार १७५ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. त्यामुळे आयटीआयच्या दुसऱ्या फेरीची प्रवेशाची टक्केवारी केवळ २४ टक्केच आहे. यंदा आयटीआय प्रवेशासाठी मिळत असलेल्या कमी प्रतिसादामुळे जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.
यंदा इतर अभ्यासक्रमांप्रमाणे आयटीआयसाठीही राज्यात कमी नोंदणी झाली आहे. यंदाही आयटीआयच्या पहिल्या फेरीत विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चितीला कमी प्रतिसाद मिळाला आहे. दुसऱ्या फेरीमध्ये सगळ्यात कमी प्रवेश औरंगाबाद जिल्ह्यात झाले असून, प्रवेशाची टक्केवारी केवळ १९.५९ टक्के आहे. औरंगाबाद विभागात ११ हजार २३८ जागा अलॉट करण्यात आल्या होत्या. त्यापैकी केवळ २ हजार २०१ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. दुसऱ्या फेरीत सर्वाधिक प्रवेश हे मुंबई विभागात झाले असून, प्रवेशाची टक्केवारी ३२.७९ टक्के इतकी आहे. मुंबई विभागातून ८,५१५ प्रवेश अलॉट करण्यात आले होते. त्यापैकी दोन हजार ७९२ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.
चौकट
तिसऱ्या फेरीकडे लक्ष
आयटीआयच्या तिसऱ्या फेरीसाठी गुणवत्ता यादी २५ सप्टेंबर रोजी जाहीर होणार आहे. प्रवेशाची पहिली आणि दुसरी फेरी मिळून राज्यात आयटीआयचे आतापर्यंत ३६.९० टक्के प्रवेश पूर्ण झाले आहेत. अमरावती विभागात ३८ टक्के, औरंगाबाद विभागात ३४ टक्के, मुंबई विभागात ४४ टक्के, नागपूर विभागात ३० टक्के, नाशिक विभागात ३७ टक्के, पुणे विभागात ३७ टक्के प्रवेश निश्चित झाले आहेत. दोन्ही फेऱ्यांत खासगीपेक्षा शासकीय आयटीआय प्रवेशाना चांगला प्रतिसाद मिळाल्याची माहिती आहे. आता आयटीआयच्या तिसऱ्या फेरीकडे विद्यार्थी पालकांचे लक्ष लागले आहे.
--
विभाग - प्रवेश फेरी १ - प्रवेश फेरी २ - एकूण प्रवेश
अमरावती - ४५९४- २०९१- ६६८५
औरंगाबाद - ४५८५- २२०१- ६७८६
मुंबई - ५२७४- २७९२- ८०६६
नागपूर - ५२१४- २२२५- ७४३९
नाशिक - ६८७४- २६९५- ९५६९
पुणे - ७३५३- ३१७१- १०५२४
एकूण - ३३८९४- १५१७५- ४९०६९