मुंबई : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खुला झालेला मलबार हिल परिसरातील निसर्ग उन्नत मार्गाला आतापर्यंत जवळपास दोन लाख पर्यटकांनी भेट दिली आहे. या मार्गावर फेरफटका मारण्यासाठी सध्या पर्यटकांना किमान एक तास आधी ऑनलाइन नोंदणी करावी लागते. ऑनलाइन प्रणालीत अडथळे आल्यास आणखी अडचणी येतात. या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा आरक्षण प्रणालीत बदल करण्याचा विचार आहे. त्यानुसार नोंदणी एक तासाऐवजी १५ मिनिटे किंवा ३० मिनिटे आधी करता येईल का, याची चाचपणी होणार आहे. याशिवाय सॉफ्टवेअर प्रणालीसोबतच स्पॉट बुकिंगसाठी नवीन व्हाॅट्सॲप क्रमांकही उपलब्ध करण्याचा विचार पालिका करीत आहे.सिंगापूर येथे विकसित ‘ट्री टॉप वॉक’ या संकल्पनेशी साधर्म्य असलेला हा उन्नत मार्ग मुंबईत पहिल्यांदाच उभारण्यात आला आहे. पालिकेच्या ‘डी’ विभागअंतर्गत फिरोजशहा मेहता उद्यान आणि कमला नेहरू उद्यान येथे जलअभियंता विभागाने हा प्रकल्प विकसित केला आहे. दररोज पहाटे ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत हा मार्ग खुला असतो. या उन्नत मार्गासाठी भारतीय नागरिकांना २५ रुपये, तर परदेशी पर्यटकांना १०० रुपये शुल्क आकारले जाते. मात्र, अनेकदा पर्यटकांना आलेल्या अनुभवावरून नोंदणीची प्रक्रिया आणि सहज आणि सोपी करण्याचा प्रयत्न पालिका करत आहे. यासाठी बाह्य संस्थेऐवजी अंतर्गत व्यवस्थेकडून करण्यात येणार आहे.
जैवविविधतेचे दर्शन निसर्ग उन्नत मार्ग येथे मुंबईच्या समृद्ध जैवविविधतेचे दर्शन घडवणाऱ्या १०० हून अधिक वनस्पतींसह झाडे, निरनिराळे पक्षी, सरपटणारे प्राणी पाहता येतात. याशिवाय एका ठिकाणावरून गिरगाव चौपटीचेही विहंगम दृश्य पाहण्याचीही संधी पर्यटकांना मिळते. मे महिन्यात ४५ हजार पर्यटकांनी या सफारीचा आनंद घेतला होता. मात्र, जूनमध्ये पर्यटकांच्या संख्येत घट झाली आहे. शिवाय प्रणालीत ही तांत्रिक अडचणी आल्याच्या काही तक्रारी पालिकेकडे आल्या होत्या.