Join us  

कोस्टल'वरून सव्वादोन लाख वाहनांची धूम; सकाळी १० ते १२ दरम्यान सर्वाधिक वर्दळ 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 10:15 AM

२७ मार्चपर्यंत म्हणजे दोन लाख २५ हजार ५५८ वाहनांनी या मार्गावरून प्रवास केला आहे.

मुंबई : मुंबईतील महत्त्वाचा रस्ते प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडची वरळी ते मरीन ड्राइव्ह दरम्यानची एक मार्गिका १२ मार्च रोजी वाहतुकीसाठी खुली झाली. तेव्हापासून २७ मार्चपर्यंत म्हणजे दोन लाख २५ हजार ५५८ वाहनांनी या मार्गावरून प्रवास केला आहे.

त्यातही सकाळी १० ते १२ आणि दुपारी ३ ते ४ दरम्यान या वेळेत प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या सर्वात जास्त असल्याचे दिसून येत आहे. तर, वरळी ते मरीन ड्राइव्हपर्यंतचा पल्ला अवघ्या १० ते १५ मिनिटांत पार करता येत असल्याने प्रवासी समाधान व्यक्त करत असून, कोस्टल रोड लवकरात लवकर पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची प्रतीक्षा करत आहेत.

धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाची वरळी ते मरीन ड्राइव्ह अशी दक्षिण वाहिनी १२ मार्चपासून प्रवासासाठी खुली झाली. पहिल्याच दिवशी या मार्गावरून सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत तब्बल १५ हजार ८३६ वाहनांनी प्रवास केला, तर १२ दिवसांत प्रवास केलेल्या वाहनांची संख्या दोन लाख २५ हजार ५५८ वर पोहोचली आहे. यामध्ये सकाळी १० ते १२ दरम्यान २२ हजार ते २५ हजार वाहनांनी प्रवास केला आहे. म्हणजेच दिवसाला सरासरी दोन हजार वाहने या वेळेत या मार्गावरून प्रवास करत आहेत.

सकाळी ८ ते सायंकाळी ५ प्रवास -

कोस्टल रोडवर सुरुवातीला सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत प्रवेश दिला जाणार होता. मात्र, वरळी सीफेस परिसरातील बिंदू माधव ठाकरे चौकातील प्रवेश मार्गावर सायंकाळी मोठी वाहतूककोंडी होऊ लागली. त्यामुळे वरळी डेअरीपर्यंत वाहनांच्या रांगा लागण्याची शक्यता असल्याने वरळीतील हा प्रवेशमार्ग सायंकाळी ५ वाजता बंद करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे.

१२ ते २७ मार्चपर्यंत वाहनांचा प्रवास-

सकाळी ८ ते ९ -     १२,२५२ 

सकाळी ९ ते १० -   २१,८४७

सकाळी १० ते ११ -  २५,३७०

सकाळी ११ ते १२-   २२,६२० 

दुपारी १२ ते १ -      २०,९१० 

दुपारी १ ते २ -        १६,८३६

दुपारी २ ते ३ -        १८,६४८ 

दुपारी ३ ते ४ -         २१,३६४ 

सायंकाळी ४ ते ५ -  १८,८९४ 

सायंकाळी ५ ते ६ -  १६,९८४ 

सायंकाळी ६ ते ७ -  १५,०८७ 

सायंकाळी ७ ते ८ -   १४,७४६ 

एकूण  -                    २,२५,५५८

टॅग्स :मुंबईवरळी