लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मध्य रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकलकरिता प्लॅटफॉर्मची क्षमता वाढविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (सीएसएमटी) प्लॅटफॉर्म क्रमांक ५ आणि ६ च्या विस्तारासाठी अडसर ठरणारी जुनी रूट रिले इंटरलॉकिंग (आरआरआय) इमारत पाडण्यात येणार आहे. त्यामुळे १५ डब्यांच्या लोकल मुख्य मार्गावर आता या लोकलच्या २२ अतिरिक्त सेवांसह एकूण ४४ फेऱ्या वाढविण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मध्य रेल्वेने सीएसएमटी येथील सिग्नलिंग यंत्रणा अद्ययावत करून तेथे इलेक्ट्रिकल इंटरलॉकिंग यंत्रणा सुरू केली. सिग्नलिंगचे सर्व कामकाज जुलैमध्ये प्लॅटफॉर्म १८ जवळच्या नवीन इमारतीमध्ये स्थलांतरित केले. त्यामुळे सिग्नलिंगची जुनी आरआरआय इमारत रिकामी झाल्याने ती पाडण्यात येणार असून, सुमारे ४०० चौरस मीटर जागा उपलब्ध होणार आहे. या जागेचा वापर प्लॅटफॉर्म ५ आणि ६ ची लांबी वाढविण्यासाठी करण्यात येणार आहे. त्यासाठी ११ कोटी ११ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. या दोन्ही प्लॅटफॉर्मची लांबी २९० वरून ३९० मीटर इतकी होणार आहे. त्यामुळे या प्लॅटफॉर्मवरून १५ डब्यांच्या लोकल चालविण्याचे नियोजन असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
१५ डब्यांची लोकल उभी करण्यासाठी सानपाडा कारशेड आणि सीएसएमटीतील प्लॅटफॉर्म ७ या दोनच जागा आहेत. सध्या १५ डब्यांच्या लोकलच्या कल्याणपर्यत २२ सेवा चालविण्यात येतात. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता १५ डब्यांच्या लोकल फेऱ्या वाढवणे गरजेचे आहे. सीएसएमटीतील दोन प्लॅटफॉर्मची लांबी वाढविल्याने सेवांची दुपटीने वाढ करण्यास प्रशासनाला मदत होणार आहे.
विस्तारीकरणात अडथळे असे...
२९० मीटर १२ डब्यांच्या प्लॅटफॉर्मची लांबी, ३९० मीटर १५ डब्यांच्या प्लॅटफॉर्मची लांबी. प्लॅटफॉर्मची लांबी वाढविण्यासाठी योग्य जागा, यार्ड रिमॉडेलिंग आणि क्रॉस ओव्हर पॉइंट्स, सिग्नल यंत्रणेत बदल करणे आवश्यक असते. हे काम गुंतागुंतीचे असते, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.