१४वर्षीय मुलाने वाचवले चिमुकलीचे प्राण

By Admin | Updated: April 27, 2015 04:32 IST2015-04-27T04:32:15+5:302015-04-27T04:32:15+5:30

२० ते २५ फूट खोल तलावात पोहण्यासाठी उतरलेल्या तीन मुली अचानक पाण्यात ओढल्या गेल्या. स्थानिकांच्या मदतीने एकीला बाहेरही काढले.

The 14-year-old son saved the life of a young man | १४वर्षीय मुलाने वाचवले चिमुकलीचे प्राण

१४वर्षीय मुलाने वाचवले चिमुकलीचे प्राण

मुंबई : २० ते २५ फूट खोल तलावात पोहण्यासाठी उतरलेल्या तीन मुली अचानक पाण्यात ओढल्या गेल्या. स्थानिकांच्या मदतीने एकीला बाहेरही काढले. तर दुसरी बुडत असताना एका १४ वर्षीय मुलाने स्वत:च्या जिवाची पर्वा न करता ५ वर्षीय चिमुरडीला सुखरुप बाहेर काढले. मोहित महेंद्र दळवी असे त्या धाडसी मुलाचे नाव असून सर्वस्तरातून त्याचे कौतुक होत आहे.
कृष्णा पाष्ट्ये (५) असे या घटनेतील जखमी चिमुरडीचे नाव आहे. मलबार हिल येथील एका खाजगी रुग्णालयात सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत. शनिवारी सायंकाळी कृष्णा आपल्या दोघा मैत्रिणींसोबत मलबार हिल येथील बाणगंगा तलावात पोहण्यासाठी उतरली होती. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्या पाण्यात बुडायला लागल्या. स्थानिकांच्या मदतीने एकीला बाहेरही काढण्यात आले.
कृष्णा बुडून तळाशी गेल्याने तिला बाहेर काढणे त्यांना शक्य झाले नाही. त्याचवेळी तेथे पोहोचलेल्या मोहितच्या कानावर ही बाब पडली. त्याने क्षणाचाही विचार न करता पाण्यात उडी घेतली. स्वत:च्या जीव धोक्यात घालून त्याने कृष्णाला सुखरुप बाहेर काढले. उपस्थितांंच्या मदतीने तिला तत्काळ जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. कृष्णा सेट एन्निस गर्ल्स हायस्कूलमध्ये सीनियर केजी वर्गात शिकते. सध्या तिची प्रकृति स्थिर आहे.
मोहितच्या या धाडसी कामगिरीला पोलिसांनीही सलाम करत त्याचा सत्कार केला. मोहितच्या आई वडिलांचे त्याच्या लहानपणीच निधन झाले. मावशीचा हात धरत मोठा झालेला मोहित बाणगंगालगत असलेल्या झोपडपट्टीमध्ये राहण्यास आहे. काम करुन तो मावशीला हातभार लावत आहे. त्याला जलतरणपटू व्हायचे आहे. युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही धाव घेत लगेचच मोहितला दत्तक घेण्याची घोषणा केली. त्याच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी घेऊन यश मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार, असे युवा सेनेचे धरम मिश्रा यांनी सांगितले.

Web Title: The 14-year-old son saved the life of a young man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.