- सचिन लुंगसे, उपमुख्य उपसंपादकवसई -विरार, कल्याण आणि ठाण्यातील जमिनीच्या खरेदी-विक्रीपासून नव्या इमारतींमधील घरे विकण्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या राजकारण्यांमुळे म्हाडाच्या कोकण मंडळाच्या घरविक्री नियोजनाला सुरुंग लागला आहे. म्हाडाच्या १४ हजार घरांची विक्री होत नसल्याने या घरांना वाली कोण, हा प्रश्न आहे, तर दुसरीकडे राजकीय वरदहस्त लाभलेल्या बिल्डरांनी मात्र मेट्रो स्टेशनपासून सगळ्या सेवांचे आमिष दाखवत ग्राहकांना आकर्षित केले आहे. त्यामुळे कमी किमतीतल्या घरांच्या विक्रीसाठी म्हाडाला आता पुन्हा पायघड्या घालाव्या लागल्या आहेत.
म्हाडाच्या फेल गेलेल्या गृहप्रकल्पांना नवसंजीवनी देण्यासाठी प्राधिकरणाने आता पुन्हा काम सुरू केले. तत्पूर्वी विरार बोळिंज, खोणी-कल्याण, शिरढोण-कल्याण, गोठेघर-ठाणे आणि भंडार्ली-ठाण्यातील घरे विकली जात नव्हती. २०१८ मध्ये काढण्यात आलेल्या लॉटरीत ९ हजार ५०० घरांचा समावेश होता. तेव्हा या घरांचा पायाही बांधण्यात आला नव्हता. आज येथे १० ते १५ हजार घरे असून, ही घरे विकण्याचे आव्हान म्हाडासमोर आहे.
सूर्या धरणाचे पाणी म्हाडाच्या घरांना आजही नीट मिळालेले नाही. रस्ते, आरोग्यासोबत उर्वरित सेवांचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे म्हाडाकडून ताबा प्रमाणपत्र घेऊनही विजेते घरात राहायला गेले नाहीत. २०१८ मध्ये म्हाडाच्या घराची (प्रधानमंत्री आवास योजना) किंमत साडेसोळा ते २०-२२ लाख होती. आजही हीच किंमत आहे. कोरोनादरम्यान खासगी बिल्डरांनी वन बीएचके घरांच्या किमती ३५ वरून ३० लाखांवर आणल्या. शिवाय सुविधाही दिल्या. त्यामुळे ग्राहकांनी म्हाडाकडे पाठ फिरवली. आज या पट्ट्यात खासगी बिल्डरांची संख्या वाढली असून, म्हाडाच्या तुलनेत सेवा चांगल्या देण्यास सुरुवात केली. डोंबिवलीमध्ये तर एका खासगी बिल्डरच्या प्रिमायसेसमध्ये मेट्रोचे स्टेशन दाखविण्यात आले आहे. या तुलनेत म्हाडाने रस्ते आणि पाणी देण्यासही कित्येक वर्षे लावली आहेत.
परिणामी म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे अत्यल्प, अल्प व मध्यम उत्पन्न गटाकरिता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावर प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत विक्रीसाठी उपलब्ध करून दिलेल्या घरांच्या विक्रीत वाढ व्हावी व गृहनिर्माण प्रकल्पांबाबत नागरिकांना माहिती देण्यासाठी मोहीम राबवली गेली आहे. त्यानुसार, आता १४ हजार घरे विकण्यासाठी वसई विरार, मीरा- भाईंदर, उल्हासनगर, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, ठाणे, पालघर, पालघर, ठाणे, अंबरनाथ आणि महापे एमआयडीसी येथील सरकारी कार्यालयात स्टॉल्स उभारले आहेत.
कुठे किती घरे?विरार बोळिंज १७४ विरार बोळिंज ४१६४ खोणी कल्याण २६२१ शिरढोण कल्याण ५७७४ गोठेघर ठाणे ७०१ भंडार्ली ठाणे ६१३ एकूण १४,०४७