Join us  

म्हाडाच्या १३०० कर्मचाऱ्यांची होणार कोविड चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2020 6:24 PM

Mhada News : माझे कुटुंब, माझी जबाबदारी

मुंबई : वाढत्या कोरोनाचा परिणाम लक्षात घेता आरोग्य खबरदारीच्या कारणात्सव आता म्हाडा कर्मचाऱ्यांची कोविड चाचणी होणार आहे. माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमे अंतर्गत म्हाडा महापालिका कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने म्हाडातील अधिकारी-कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी कोविड चाचणी शिबिराचे ५ ऑक्टोबरपासून आयोजन करण्यात आले आहे.

म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात तळ मजल्यावरील महाराष्ट्र गृहनिर्माण कर्मचारी संघटनेच्या कार्यालयात ९ ऑक्टोबरपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत चालणाऱ्या या शिबिरात म्हाडाच्या मुंबईस्थित सुमारे १३०० कर्मचाऱ्यांची व विनामूल्य कोविड चाचणी केली जाणार आहे.  या व्यतिरिक्त सुरक्षा रक्षक, कंत्राटी कर्मचारी यांचीही या शिबिरात अँटीजेन आणि आवश्यकतेनुसार आरटी-पीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. एखाद्या कर्मचाऱ्याचा कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्यांच्या कुटुंबीयांचीही विनामूल्य चाचणी केली जाणार आहे.      

जे अधिकारी - कर्मचारी पॉझिटिव्ह आढळतील त्यांना  पालिकेच्या कोविड सेंटर्समध्ये तसेच म्हाडातर्फे उभारण्यात आलेल्या कोविड सेंटर्समध्ये प्रवेश मिळवून देण्याकरिता मार्गदर्शन आणि सहाय्य केले जाईल. चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या अधिकारी - कर्मचारी यांना शासनाच्या प्रोटोकॉलनुसार निर्देश दिले जाणार आहेत. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबईमुंबई महानगरपालिका