बीडीडी पुनर्विकासातून १३ हजार ६१३ घरे
By Admin | Updated: September 2, 2015 02:50 IST2015-09-02T02:50:28+5:302015-09-02T02:50:28+5:30
मुंबईतील वरळी, नायगाव आणि ना.म. जोशी मार्ग येथील ब्रिटिशकालीन बीडीडी चाळींचा पुनर्विकास करण्यासाठी म्हाडाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत

बीडीडी पुनर्विकासातून १३ हजार ६१३ घरे
तेजस वाघमारे, मुंबई
मुंबईतील वरळी, नायगाव आणि ना.म. जोशी मार्ग येथील ब्रिटिशकालीन बीडीडी चाळींचा पुनर्विकास करण्यासाठी म्हाडाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. अनेक वर्षांपासून रखडलेला पुनर्विकास प्रकल्प म्हाडाने मार्गी लावल्यास म्हाडाला अतिरिक्त १३ हजार ६१३ घरे उपलब्ध होणार आहेत. यामधील ५ हजार ६९८ घरे अत्यल्प उत्पन्न गटातील असल्याने मुंबईकरांना परवडणाऱ्या किमतीत घर मिळण्याची शक्यता आहे.
नवीन सरकारने बीडीडी चाळींचा पुनर्विकास २0२२पर्यंत मार्गी लावण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार पुनर्विकासाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांसमोर सादरीकरण झाल्यानंतर त्यांच्या आदेशानुसार म्हाडाने या चाळींच्या पुनर्विकासासाठी वास्तुविशारदांकडून निविदा मागविल्या आहेत.
नायगाव बीडीडी चाळीत सध्या ३ हजार ४९५ घरे अस्तित्वात आहेत, तर ना.म. जोशी मार्ग परळ येथे २ हजार ६0६ आणि वरळी येथे १0 हजार १२८ घरे आहेत. या चाळींच्या पुनर्विकासातून म्हाडाला विक्रीसाठी अतिरिक्त १३ हजार ६१३ घरे उपलब्ध होणार आहेत. यामध्ये २ हजार ४५३ घरे नायगाव येथे तर ना.म. जोशी मार्ग परळ येथे १ हजार ९९९ आणि वरळी येथे ९ हजार १६१ घरे उपलब्ध होणार आहेत. बीडीडी चाळींचा पुनर्विकास खासगी विकासकांमार्फत करायचा की म्हाडामार्फत याबाबत अद्याप सरकारने निर्णय घेतलेला नाही. म्हाडाने विकास केल्यास सर्वसामान्यांसाठी लॉटरीच्या माध्यमातून परवडणारी घरे उपलब्ध होणार आहेत.
म्हाडामार्फत पुनर्विकास झाल्यास ना.म. जोशी मार्ग येथे अत्यल्प उत्पन्न गटातील ८ हजार १७ आणि वरळी येथे ३ हजार ८३९ अशी एकूण ५ हजार ६९८ अतिरिक्त घरे उपलब्ध होतील. तर अल्प उत्पन्न गटासाठी नायगाव येथे ६३८, ना.म. जोशी मार्ग येथे ५४५ आणि वरळी येथे २ हजार ५८६ अतिरिक्त घरे मिळतील. मध्यम उत्पन्न गटात नायगाव येथे ५१६ , ना.म. जोशी मार्ग येथे ४१९ आणि वरळी येथे २ हजार ६६२ अशी एकूण २ हजार ५९७ घरे आणि उच्च उत्पन्न गटात नायगाव येथे २६७, ना.म. जोशी मार्ग येथे २१८ आणि वरळी येथे १0३६ अशी एकूण १ हजार ५१९ अतिरिक्त घरे उपलब्ध होतील.