Join us  

समता प्रतिष्ठानमधील घोटाळ्यांप्रकरणी १३ निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2021 6:36 AM

प्रश्नोत्तराच्या तासात शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी या घोटाळ्यांबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. ढळढळीत भ्रष्टाचार झालेला आहे, आधीच्या मंत्र्यांचे कोण नातेवाईक त्यात आहेत, घोटाळेबाजांवर काय कारवाई करणार, निविदा न काढताच कामे देण्यात का आली, असा सवाल त्यांनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बार्टीअंतर्गत नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानमध्ये कोट्यवधी रुपयांचे घोटाळे गेल्या सरकारच्या काळात झाल्याची बाब तपासात समोर आली असल्याचे सांगतानाच या प्रतिष्ठानमधील १३ अधिकारी, कर्मचाऱ्यांना निलंबित करीत असल्याची घोषणा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी बुधवारी विधानसभेत केली. या प्रकरणाची एसआयटी चौकशीही होणार आहे.प्रश्नोत्तराच्या तासात शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी या घोटाळ्यांबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. ढळढळीत भ्रष्टाचार झालेला आहे, आधीच्या मंत्र्यांचे कोण नातेवाईक त्यात आहेत, घोटाळेबाजांवर काय कारवाई करणार, निविदा न काढताच कामे देण्यात का आली, असा सवाल त्यांनी केला.त्यावर, अंकेक्षण अहवालात साडेतीन कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची बाब समोर आली आहे. संस्थेला शासनाकडून देण्यात आलेल्या १६ कोेटींपैकी १४ कोटींच्या रकमेत घोटाळे झाल्याचा अंदाज आहे. सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असून समितीचा अहवाल येताच कारवाई केली जाईल, असे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले. या प्रकरणात कॅगच्या अहवालात कुठलाही ठपका नाही ही बाब खरी आहे का, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी  विचारताच कॅगपासून अंकेक्षण अहवाल लपवून ठेवण्यात आला होता असे मुंडे म्हणाले. विभागाला न विचारताच लाखोंच्या रकमा वाटणे, स्वयंपाक्याला प्रकल्प अधिकारी करणे असे गंभीर प्रकार घडले असल्याचे त्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांची नावे घ्या, त्यांना निलंबित करा, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी केली. त्यावर, वरील चार अधिकाऱ्यांच्या निलंबनाची घोषणा करतानाच प्रधान सचिवांच्या चौकशीत बार्टीचे तत्कालीन महासंचालक दोषी आढळले तरी सर्व दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे मुंडे यांनी स्पष्ट केले. निलंबित अधिकारी, कर्मचाऱ्यांची नावे त्यांनी सभागृहाच्या पटलावर ठेवली.

निलंबित अधिकारी कर्मचारी असेलेखाधिकारी शीलसागर चहांदे, प्रकल्प अधिकारी सोनाली बडोले, ज्योती करवडे, श्यामराव बन्सोड, उमेश सांगोडे, उपास वाघमारे, नागेश वाहूरवाघ, तुषार सूर्यवंशी, ओमेश नंदेश्वर, प्रकाश रहांगडाले, प्रकल्प समन्वयक बादल श्रीरामे, प्रकल्प सहायक हर्षल गावंडे, शिपाई संगीता नुन्हारे यांना निलंबित करण्यात आले.

टॅग्स :धनंजय मुंडेधोकेबाजी