Join us

पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 06:17 IST

पश्चिम रेल्वेवर वाढविण्यात येणाऱ्या नव्या एसी लोकलचा फायदा मुख्यत्वे भाईंदरच्या प्रवाशांना होणार आहे

मुंबई - पश्चिम रेल्वेवर दाखल झालेली नवीन एसी लोकल बुधवारपासून सुरू होणार आहे. या १२ डब्यांच्या नवीन लोकलमुळे एसी लोकलच्या १३ फेऱ्या वाढणार असून, त्यांची संख्या कार्यालयीन दिवसांमध्ये ९६ वरून १०९ इतकी होणार आहे, तर शनिवारी आणि रविवारी ५२ वरून ६५ होणार आहे.

पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट स्थानकावरून बुधवारी दुपारी १२:३४ वाजता नवी एसी लोकल सुटणार आहे. एसीच्या वाढीव फेऱ्यांमुळे पश्चिम रेल्वेवरील एकूण सेवांमध्ये वाढ होणार नाही, तर त्यांची संख्या १,४०६ इतकीच राहणार आहे. यात एसी लोकलच्या डाऊन मार्गावर ६ आणि अप मार्गावर ७ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. 

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, प्रवाशांच्या मागणीप्रमाणे साध्या लोकलच्या फेऱ्या कमी करून त्या जागी एसीच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. वाढीव फेऱ्यांनुसार अप मार्गावर विरार - चर्चगेट आणि भाईंदर - चर्चगेट अशा २-२ फेऱ्या चालविण्यात येतील, तर विरार - वांद्रे आणि भाईंदर - अंधेरी दरम्यान १-१ फेरी चालविली जाणार आहे. त्याचप्रमाणे, डाऊन मार्गावर चर्चगेट - विरार आणि चर्चगेट - भाईंदर, अंधेरी - विरार, वांद्रे - भाईंदर, महालक्ष्मी - बोरीवली आणि बोरीवली - भाईंदरच्या दरम्यान १-१ फेरी चालविण्यात येणार आहे.

प्रामुख्याने भाईंदरच्या प्रवाशांची सोयपश्चिम रेल्वेवर वाढविण्यात येणाऱ्या नव्या एसी लोकलचा फायदा मुख्यत्वे भाईंदरच्या प्रवाशांना होणार आहे. कारण विरारवरून येणाऱ्या एसी लोकलमध्ये भाईंदरच्या प्रवाशांना चढायला मिळत नाही. नव्या एसी लोकलची पहिली फेरी सकाळी ८:३०ला भाईंदरवरून सुटेल, तसेच  संध्याकाळी वांद्रे आणि अंधेरीवरून भाईंदरसाठी लोकल सुटणार असल्याने, याचा फायदा भाईंदरच्या प्रवाशांना मुख्यत्वे होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

चार वर्षांची प्रतिक्षापश्चिम रेल्वेच्या ताफ्यात दाखल झालेली नवीन एसी लोकल चेन्नईच्या इंटेग्रल कोचिंग फॅक्टरीमध्ये तयार करण्यात आली आहे. ही लोकल गेल्या आठवड्यात २० तारखेला विरार यार्डमध्ये दाखल झाली होती. प्रवाशांच्या मागणीनंतर चार वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर नवीन एसी लोकल मिळाली आहेत. 

टॅग्स :पश्चिम रेल्वेएसी लोकलमुंबई लोकल