Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुलुंडमधील चेंगराचेंगरीत १३ जण जखमी; अफवांची भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2018 04:55 IST

मुलुंडमध्ये शुक्रवारी सकाळी महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलच्या कार्यालयाबाहेर आॅफलाइन नोंदणी करताना झालेल्या चेंगराचेंगरीत १३ जण जखमी झाले आहेत.

मुंबई : मुलुंडमध्ये शुक्रवारी सकाळी महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलच्या कार्यालयाबाहेर आॅफलाइन नोंदणी करताना झालेल्या चेंगराचेंगरीत १३ जण जखमी झाले आहेत. यात आदित्य शिंगाळे (२०) हा तरुण गंभीर जखमी झाला. त्याच्या कानाला दुखापत झाली असून, खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामध्ये एक पोलीसही जखमी झाला.मुलुंड पश्चिमेला एलबीएस मार्गावर हे कार्यालय आहे. या ठिकाणी डी फार्म आणि बी फार्मची आॅनलाइन आणि आॅफलाइन नोंदणी केली जाते. आॅफलाइन नोंदणी प्रक्रियेची मुदत ७ आॅगस्टपर्यंत आहे. मराठा आंदोलनामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळेयेथील तरुणांना अर्ज करण्यास येणे शक्य नव्हते. त्यामुळे वातावरण शांत झाल्यानंतर, शुक्रवारी अनेक विद्यार्थी नोंदणीसाठी येथे आले होते. पहाटे ४ वाजल्यापासूनच त्यांनी कार्यालयाबाहेर रांगा लावल्या होत्या. येथे परवाना नोंदणीसाठी राज्यभरातूनआलेल्या जवळपास ३ हजारांहूनअधिक तरुण-तरुणींनी गर्दी केली होती. सकाळी साडेआठ-नऊच्या दरम्यान पाऊस आल्यामुळे पावसापासून वाचण्यासाठी तरुणांनी धावपळ सुरू केली. यागोंधळात तेथील प्रवेशद्वार तुटले आणि चेंगराचेंगरी झाली.मुलीला प्रवेशद्वाराखालून काढले‘सकाळी ७ पासून माझी मुलगी रांगते उभी होती. रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांमुळे ती व्यवस्थित आहे ना? यासाठी सारखा डोकावत होतो. दरम्यान पावसाने जोर धरला. काही कळण्याआधीच गर्दी वाढली. कोमल.. कोमल म्हणून मुलीचा शोध घेत होतो. ती दिसेना. त्यातच अचान दरवाजा तुटून चेंगराचेंगरी झाली. मी कसाबसा सावरत मुलीला शोधू लागलो. ती तुटलेल्या प्रवेशद्वाराखाली अडकलेली दिसली. तिला पाहून क्षणभर काळजाचा ठोकाच चुकला. तिच्यापर्यंत पोहचताना, मीही पडलो. कसबसे स्वत:ला सावरुन उठलो. मुलगी गर्दीत चिरडली जाण्यापूर्वीच तिला ओढले. त्यामुळेच ती वाचली,’ असे वाशीममधून आलेले अरुण साबू (६५) यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.ढिसाळ नियोजनकार्यालयाच्या आवारात बसण्यासाठी व्यवस्था असतानाही, आतमध्ये प्रवेश देण्यात आला नाही. महाराष्ट्र फार्मसी काऊन्सिलने खबरदारी घेणे गरजेचे होते. मात्र ढिसाळ नियोजनामुळेच ही परिस्थिती निर्माण झाल्याचे, वाशीमचे आनंदा भगत यांनी सांगितले. ते मुलगी अंजलीसोबत आले होते.तो देवदूतासारखा आला...‘क्षणभर गर्दीचा लोंढा अंगावर आला. वाचवा वाचवा म्हणून ओरडत होते. त्या वेळी देवानंद शेजूल नावाच्या तरुणाने मदतीचा हात दिला. गर्दीतून बाहेर काढले. तो देवदूतासारखा आला, म्हणून वाचले, ‘असे औरंगाबादच्या स्वाती बराथे या विद्यार्थिनीने सांगितले. ती तिच्या ७ मैत्रिणींसोबत सकाळी ४ वाजल्यापासून रांगेत उभी होती..अफवांची भर...पावसामुळे विद्यार्थ्यांनी प्रवेशद्वाराबाहेर गर्दी केली. मुलींनी आधी प्रवेशद्वार अडविले. सुरुवातीला मुलींनाच आत सोडणार, अशी अफवा पसरली. पुढे दोनशेच जणांचे अर्ज आज भरले जाणार, अशी माहिती मिळाली. यामुळे प्रत्येक जण पुढे जाण्याचा प्रयत्न करत होता. पहिले कोण, या धडपडीत चेंगराचेंगरी झाल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.भविष्यात पोलिसांची मदत घेणारफार्मसी नोंदणीसाठी एकाच वेळी खूप मोठ्या संख्येने विद्यार्थी आल्याने त्यांना आवरणे कठीण झाल्याने चेंगराचेंगरी झाली. भविष्यात असा काही प्रकार घडू नये म्हणून पोलिसांची मदत घेण्यात येणार आहे. नोंदणी बंद करण्यात येणार नसून प्रक्रिया चालू राहणार आहे. कारण, काही मुले खूप दूरवरून आलेली आहेत. तसेच जखमी विद्यार्थ्यांसाठी काही मदत करता येते का हेही ठरवले जाणार आहे.- विजय पाटील,फार्मसी कौन्सिल अध्यक्ष

टॅग्स :मुंबई