Join us  

कांदिवली बोरिवली व दहिसर येथे आढळून आले कोरोनाचे १२९ रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 3:33 PM

बोरिवलीच्या आर मध्य वॉर्ड मध्ये स्लम पेक्षा इमारती व गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये कोरोनाचे प्रमाण वाढत आहे.

मनोहर कुंभेजकर

मुबंई : कोरोनाचा हॉटस्पॉट झालेल्या पालिकेच्या परिमंडळ 7 मध्ये काल संध्याकाळी 6 पर्यंत कोरोनाचे 129 नवीन रुग्ण आढळून आले. विशेष म्हणजे बोरिवलीच्या आर मध्य वॉर्ड मध्ये स्लम पेक्षा इमारती व गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये कोरोनाचे प्रमाण वाढत आहे.

पालिका प्रशासनाच्यावतीने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची "चेस द व्हायरस"  ही मोहिम युद्धपातळीवर राबवण्यात येत असल्याची माहिती परिमंडळ 7 चे उपायुक्त विश्वास शंकरवार यांनी लोकमतला दिली. येथील पूर्ण परिसर हा लॉकडाऊन केला नसून ज्या ठिकाणी कोरोना रुग्ण आढळून आले आहेत अश्या 1094 इमारती सील करण्यात आल्या आहेत. त्यातील जाणारे जर चार रस्ते असतील तर त्यापैकी अत्यावश्यक सेवेसाठी आणि नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून 3 रस्ते  सील केले आहेत.ज्याठिकाणी एसआरए इमारतीत जर कोरोनाचे रुग्ण आढळले तर पूर्ण इमारत सील केली जाते अशी माहिती उपायुक्त शंकरवार यांनी दिली. या परिमंडळात आर दक्षिण( कांदिवली),आर मध्य( बोरिवली) व आर उत्तर( दहिसर) हे वॉर्ड मोडतात.

आर दक्षिण वॉर्ड मध्ये काल 32 कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून येथे कोरोना रुग्णांची एकूण संख्या 2182 झाली असून 1257 रुग्ण कोरोनामुक्त झाले,तर 119 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.या वॉर्ड मध्ये 1178 रुग्ण हे स्लम मध्ये आढळले असून हे प्रमाण 54 टक्के आहे. तर येथील इमारती व सोसायटी मध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या 1104 असून हे प्रमाण 46 टक्के आहे.या वॉर्ड मध्ये कोरोनाचा डबलिंग रेट हा 11.56 दिवस आहे. 

आर मध्य वॉर्ड मध्ये काल 68 कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून येथे कोरोना रुग्णांची एकूण संख्या 2072 झाली असून 804 रुग्ण कोरोनामुक्त झाले,तर 107 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या वॉर्ड मध्ये 485 रुग्ण हे स्लम मध्ये आढळले असून हे प्रमाण 21.40 टक्के आहे. तर येथील इमारती व सोसायटीमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या 1587 असून हे प्रमाण 76.60 टक्के आहे.तर कोरोनाचा डबलिंग रेट हा 16 दिवस आहे.विशेष म्हणजे या वॉर्ड मध्ये इमारती व गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये कोरोनाचे प्रमाण वाढत आहे असे या आकडेवारी वरून स्पष्ट होते.

आर उत्तर वॉर्ड मध्ये काल 29 कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून येथे कोरोना रुग्णांची एकूण संख्या 1341 झाली असून 482 रुग्ण कोरोनामुक्त झाले,तर 109 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.या वॉर्ड मध्ये 701 रुग्ण हे स्लम मध्ये आढळले असून हे प्रमाण 52.42 टक्के आहे.तर येथील इमारती व सोसायटीमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या 638 असून हे प्रमाण 47.57 टक्के आहे.तर कोरोनाचा डबलिंग रेट हा 14 दिवस आहे अशी आजपर्यतची सविस्तर आकडेवारी उपायुक्त शंकरवार यांनी दिली. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई