मुंबई : सामाजिक न्याय विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी उच्च दर्जाची वसतिगृहे उभारण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्यभरात १२० ठिकाणी वसतिगृहे उभारली जाणार असून, यामुळे २५ हजार विद्यार्थ्यांना निवासी सुविधा उपलब्ध होणार आहेत. यासाठी शासनाने १२०० कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले.
सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागांतर्गत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह युनिट १, २, ३ व संत एकनाथ मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहाच्या नूतन इमारतींचा उद्घाटन सोहळा चेंबूर येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आ. तुकाराम काते, समाजकल्याण आयुक्त बाबासाहेब बेलदार, प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे, सहायक आयुक्त रविकिरण पाटील, सहायक आयुक्त समाधान इंगळे, सहायक आयुक्त सुनील जाधव, सहायक आयुक्त वर्षा चव्हाण यांची उपस्थिती होती.