मोलकरणीवर १२ वर्षे बलात्कार, क्रूर छळ
By Admin | Updated: January 15, 2015 23:20 IST2015-01-15T23:20:39+5:302015-01-15T23:20:39+5:30
बोळिंज येथे राहणाऱ्या व प्ले स्कूल चालविणाऱ्या लिआॅन लांबा याला घरातील मोलकरणीवर १२ वर्षे बलात्कार करण्याच्या व तिचा अनन्वित छळ करण्याच्या

मोलकरणीवर १२ वर्षे बलात्कार, क्रूर छळ
विरार : बोळिंज येथे राहणाऱ्या व प्ले स्कूल चालविणाऱ्या लिआॅन लांबा याला घरातील मोलकरणीवर १२ वर्षे बलात्कार करण्याच्या व तिचा अनन्वित छळ करण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली असून त्याला २० जानेवारीपर्यंत कोठडी देण्यात आली आहे.
भयानक म्हणजे या सगळ्या कटात लिआॅनची पत्नी रिमा हीदेखील त्याला साथ देत होती. ती सध्या फरार असून तिचा शोध पोलीस घेत आहेत. लांबा दाम्पत्य हे मूळचे दार्जिलिंगचे. बंगालमधल्या २४ परगणा येथील ते रहिवासी. इ.स. २००० मध्ये ते वसई-विरार परिसरात आले. येताना त्यांनी उत्तम नोकरी, चांगला पगार व अनेक सुविधा देणारी नोकरी देण्याच्या नावाखाली एका युवतीलाही मोलकरीण म्हणून सोबत आणले. परंतु, त्याने तिला यातले काहीही देण्याऐवजी वेठबिगारासारखे वागविण्यास सुरुवात केली. त्यांनी तिचा अनन्वित छळ केलाच, शिवाय तिला तिच्या चुकांचा धडा शिकविण्यासाठी तिच्यावर बलात्कार करण्यास प्रारंभ केला.
या सगळ्या छळात आणि बलात्कारकांडात लिआॅनची पत्नी रिमा हीदेखील सहभागी असायची. रोज रात्री मद्यपान केले की, लिआॅन आपल्यावर बलात्कार करायचा, असे या युवतीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. लिआॅन दाम्पत्याच्या घरात त्यांची कन्या राहत असतानाही हे वासनाकांड इतकी वर्षे सुरू होते.
या युवतीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, हे दोघे माझ्या कामात चुका काढायचे आणि बेदम मारहाण करायचे, कधी तिखट खायला लावायचे. एकदा लाइट गेले असता मेणबत्ती लावण्यास उशीर झाला म्हणून हातपाय पकडून जमिनीवर दाबून ठेवून माझ्या सर्वांगावर मेणबत्तीच्या तापलेल्या मेणाच्या थेंबांनी मला चटके दिले गेले. मच्छर हटावच्या पेटलेल्या कॉइलने मला दोनशे चटके दिले गेले. दिवसभर स्वयंपाक करायला लावून आपल्याला मात्र उपाशी ठेवले जात होते. एकदा मी केलेल्या स्वयंपाकात केस निघाला म्हणून माझे केस कापून ते उकळत्या पाण्यात टाकले गेले आणि ते पाणी मला सतत तीन दिवस पिण्यास भाग पाडले गेले. या काळात मला अन्नाचा एक कणही दिला गेला नव्हता. पोलिसांनी केलेल्या वैद्यकीय पाहणीत तिच्या शरीरावर चटके दिल्याचे २०० डाग आढळून आले. याबाबत, अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, या कुटुंबीयांचा डोळा चुकवून घराबाहेर पडण्यात ती यशस्वी झाली. नंतर, तिने पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपली तक्रार नोंदवली. पोलिसांनी फ्लॅटवर धाड घातली तेव्हा तिथे लिआॅन व त्याची पत्नी होती. त्याला अटक झाली, परंतु सोबत महिला पोलीस अधिकारी नसल्याने व तो असल्याशिवाय महिला आरोपीला अटक करता येत नसल्याने लिआॅनची पत्नी रिमा फ्लॅटमध्ये असली तरी तिला पोलिसांना अटक करता आली नाही. वसई न्यायालयात त्याला हजर केले असता २० जानेवारीपर्यंत त्याला कोठडी देण्यात आली. दरम्यान, ती फरार झाली आहे.
लिआॅन हा आपल्याच फ्लॅटमध्ये प्ले स्कूल आणि मुलांचे वसतिगृह चालवत होता. शिवाय, त्याचा बांद्र्यामध्ये कार भाड्याने देण्याचा व्यवसाय आहे. या घटनेतील पीडित युवतीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (विशेष प्रतिनिधी)