१२ वर्षीय मुलीचे अपहरण
By Admin | Updated: March 28, 2017 03:45 IST2017-03-28T03:45:54+5:302017-03-28T03:45:54+5:30
तुझ्या वडिलांना पोलिसांनी पकडले असून, आईही तेथे पोहचत असल्याचे सांगून १२ वर्षांच्या मुलीचे चाकूचा

१२ वर्षीय मुलीचे अपहरण
मुंबई : तुझ्या वडिलांना पोलिसांनी पकडले असून, आईही तेथे पोहचत असल्याचे सांगून १२ वर्षांच्या मुलीचे चाकूचा धाक दाखवत अपहरण केल्याची घटना रविवारी पंतनगरमध्ये घडली. मुलीच्या सुटकेसाठी २ लाखांची मागणी करण्यात आली होती. पंतनगर पोलिसांनी अवघ्या ४ तासांतच अपहरणकर्त्याला बेड्या ठोकल्या. प्रभू संतोष खेडेकर (३०) असे आरोपीचे नाव असून, तो अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे.
विक्रोळी पूर्वेकडील कन्नमवार नगर परिसरात १२ वर्षांची अंजू (नावात बदल) पालकांसह राहते. त्याच भागातून जात असताना खेडेकरची नजर अंजूवर पडली. अंजू श्रीमंत घरातली असेल असे समजून त्याने तिच्यावर पाळत ठेवली. रविवारी अंजू शिकवणीला जाण्यासाठी निघाली. त्यावेळी घाटकोपर बेस्ट कॉलनी येथे खेडेकरने तिला अडविले. ‘वडिलांना पोलीस ठाण्यात नेले आहे. आईही तेथे पोहोचत आहे. तुलाही बोलावले आहे,’ असे सांगून चाकूचा धाक दाखवू तिला बाईकवरून पळवून नेले. त्यानंतर वडिलांना खंडणीसाठी फोन केला. पोलिसांनी त्याला अटक करत मुलीची सुटका केली. (प्रतिनिधी)
खेडेकरवर ६ गुन्हे
प्रभू खेडेकर हा अभिलेखावरील आरोपी आहे. त्याच्याविरुद्ध विविध जिल्ह्यांत ६ गुन्ह्यांची नोंद आहे. रत्नागिरीत देवळातील मूर्ती चोरीचे २ गुन्हे, पवईत २ आणि विक्रोळीत २ गुन्हे दाखल असल्याची माहिती पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी दिली.