हार्बरवर १२ डब्यांचे स्वप्न दूरच
By Admin | Updated: July 30, 2015 00:10 IST2015-07-30T00:10:35+5:302015-07-30T00:10:35+5:30
मरेची मेन लाइन आणि परेवर सोयीसुविधांचा वर्षाव होत असतानाच हार्बरवरील प्रवासी मात्र उपेक्षित राहिले आहेत. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनतर्फे (एमआरव्हीसीकडून) १२ डब्यांच्या

हार्बरवर १२ डब्यांचे स्वप्न दूरच
मुंबई : मरेची मेन लाइन आणि परेवर सोयीसुविधांचा वर्षाव होत असतानाच हार्बरवरील प्रवासी मात्र उपेक्षित राहिले आहेत. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनतर्फे (एमआरव्हीसीकडून) १२ डब्यांच्या गाड्यांसाठी प्लॅटफॉर्मच्या विस्ताराची कामे केली जात आहेत. वर्षभरापासून सुरू असलेल्या या कामांना सहा महिन्यांचा कालावधी तरी लागेल, असे एमआरव्हीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रभात सहाय यांनी सांगितले.
पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर १२ आणि १५ डबा लोकल धावत आहेत. आता १५ डबा लोकलची संख्या वाढवण्याचाही विचार केला जात आहे. मात्र हार्बरवर नऊ डबा लोकलच धावत आहेत. मध्य रेल्वे मार्गावर धावत असलेल्या एकूण १२१ लोकलपैकी ३६ हार्बरवर तर १० ट्रान्स हार्बरवर धावत आहेत. मात्र या एकूण ४६ लोकलमधील २७ लोकल जुन्या असून त्यांचे आयुर्मान संपले आहे. त्या २५ वर्षापेक्षा जुन्या आहेत. त्यामुळे बारा डबा लोकल चालवण्याचा निर्णय एमआरव्हीसीकडून घेण्यात आला. त्यासाठी गेल्या एक वर्षापासून फलाटांच्या विस्ताराचे काम सुरू आहे. यात वडाळा स्थानकात काम जरी सुरू असले तरी ते फारच धिम्या गतीने होत आहे. तर सीएसटी स्थानकातील हार्बरच्या फलाट क्रमांक १ आणि २च्या विस्ताराचे काम एमआरव्हीसी आणि मध्य रेल्वेसमोरील मोठी समस्या असल्याचे सांगण्यात आले. यासाठी दोन्ही प्लॅटफॉर्मवरील वाहतूक बंद करून ती मेन लाइनवर वळवावी लागेल. यामुळे हार्बरचा पूर्णत: बोऱ्याही वाजू शकतो. त्याचे वेळापत्रक अजूनही बनवण्यात आले नसल्याचे सांगितले.
डबेही अपुरेच
फलाटांच्या विस्ताराचा प्रश्न अनुत्तरित असतानाच १२ डबा लोकलसाठी डबे आणणार कुठून, असा सवाल रेल्वे अधिकारी उपस्थित करत आहेत. सुमारे १५० डबे लागणार आहेत. हे डबे ताफ्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती देण्यात आली.
साधारणपणे सहा महिने बारा डबा प्रकल्प पूर्ण होण्यास लागेल. प्लॅटफॉर्मची कामे बाकी असून यात सीएसटी स्थानकातील काम महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे बारा डबा लोकलसाठी आणखी डबेही लागणार आहेत.
- प्रभात सहाय (एमआरव्हीसी -व्यवस्थापकीय संचालक)