फेब्रुवारी महिन्यात मुंबईत ११,७४२ मालमत्तांची विक्री
By मनोज गडनीस | Updated: February 29, 2024 19:57 IST2024-02-29T19:57:04+5:302024-02-29T19:57:30+5:30
मुद्रांक शुल्कापोटी राज्य सरकारला मिळाले ८६५ कोटी रुपये.

फेब्रुवारी महिन्यात मुंबईत ११,७४२ मालमत्तांची विक्री
मुंबई - नववर्षाच्या दुसऱ्या महिन्यातही मुंबई व उपनगरातील मालमत्तांच्या खरेदीचा जोर कायम असून फेब्रुवारी महिन्यात एकूण ११ हजार ७४२ मालमत्तांची विक्री झाली आहे. यामध्ये ८० टक्के मालमत्ता या निवासी स्वरूपाच्या आहेत तर २० टक्के मालमत्ता या व्यावसायिक स्वरुपाच्या आहेत. एका महिन्यात ११ हजार मालमत्तांची विक्री हा गेल्या १२ वर्षांतील उच्चांक ठरला आहे. जानेवारी महिन्यात मुंबईत १०,९६७ मालमत्तांची विक्री झाली होती. बांधकाम उद्योगातील अग्रगण्य नाईट फ्रँक कंपनीने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून ही माहिती पुढे आली आहे.
गेल्यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत मालमत्ता विक्रीमध्ये २१ टक्के वाढ नोंदली गेली आहे. गेल्या फेब्रुवारीमध्ये मुंबई व उपनगरात ९६८४ मालमत्तांची विक्री झाली होती. अर्थात, यावर्षीच्या फेब्रुवारीमध्ये मालमत्ता विक्रीचा आकडा जरी जास्त असला तरी गेल्या फेब्रुवारीच्या तुलनेत यंदा मुद्रांक शुल्कापोटी मिळालेल्या रकमेत मात्र घट झाली आहे. गेल्यावर्षी राज्य सरकारला फेब्रुवारी महिन्यातील मालमत्ता विक्रीद्वारे १११२ कोटी रुपये मुद्रांक शुल्कापोटी मिळाले होते. यंदाच्या फेब्रुवारीमध्ये ८६५ कोटी रुपये मिळाले आहेत.