Join us

अकरा महिन्यांत मुंबईत दाखल झाल्या 1,173 इम्पोर्टेड गाड्या; ७२ लाखांची बाईक, तर २१ कोटींच्या कारची सर्वांना भुरळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 10:53 IST

महागड्या गाड्या आणि त्यांच्यासाठी प्रीमियम नोंदणी क्रमांक घेण्यासाठी खेळाडू, सेलिब्रिटी, आणि शौकिनांकडून मोठ्या प्रमाणावर खर्च केला जात असल्याचेही समोर आले आहे.

मुंबई : भारताची आर्थिक राजधानी मुंबईत, यावर्षी जानेवारी ते नोव्हेंबर अशा ११ महिन्यांमध्ये तब्बल १०९० इम्पोर्टेड गाड्यांची नोंदणी झाली आहे. या गाड्यांमध्ये १०११ लक्झरी कार आणि १६२ उच्च दर्जाच्या बाईक्सचा समावेश आहे. महागड्या गाड्या आणि त्यांच्यासाठी प्रीमियम नोंदणी क्रमांक घेण्यासाठी खेळाडू, सेलिब्रिटी, आणि शौकिनांकडून मोठ्या प्रमाणावर खर्च केला जात असल्याचेही समोर आले आहे.

इंपोर्टेड गाड्यांमुळे दिमाख वाढला असून रस्त्यावर यामध्ये ७२ लाखांची बाईक, २०.९० कोटींच्या कारचा समावेश आहे. या दोन्ही गाड्या ताडदेव आरटीओमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत.  परदेशातून आयात केलेल्या गाड्यांच्या नोंदणी प्रक्रियेसाठी विक्री किमतीच्या २० टक्के रक्कम टॅक्स म्हणून भरावी लागते; मात्र ही रक्कम जास्तीत जास्त २० लाखांपर्यंत मर्यादित आहे.

 या महसुलाच्या माध्यमातून मुंबईतील आरटीओंना ११ महिन्यांत ११५ कोटी ३५ लाख ११ हजार रुपयांचा महसूल मिळाल्याचेही आता उघड झाले आहे. महागड्या गाड्या खरेदी करणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने व्यावसायिक, खेळाडू, सेलिब्रिटी, आणि तरुण शौकिनांचा समावेश असतो.

 अनेक तरुण-तरुणी त्यांचे फोटो या लक्झरी गाड्यांसोबत कॅमेराबद्ध करण्यासाठी उत्सुक दिसतात. स्टायलिश डिझाइन्स, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि वेगवान कामगिरीमुळे या गाड्या केवळ त्यांच्या मालकांनाच नव्हे तर रस्त्यावरील प्रत्येकाला भुरळ घालताना दिसत आहेत.

 परदेशातून आलेल्या या गाड्या केवळ एक वाहन नसून, त्यातून त्यांच्या मालकांची प्रतिष्ठा आणि रसिकतेचा प्रत्यय येतो. एकूणातच या गाड्या मुंबईकरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत.

सर्वाधिक महागड्या गाड्या ताडदेवमध्ये

मुंबईतील चार प्रमुख आरटीओ म्हणजे ताडदेव, अंधेरी, वडाळा, आणि बोरिवली येथे या इम्पोर्टेड गाड्यांची नोंदणी झाली आहे. यामध्ये ताडदेव आरटीओत सर्वाधिक महागड्या गाड्यांची नोंद झाली.