राज्यातील ११ हजार शाळा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:18 IST2020-12-04T04:18:15+5:302020-12-04T04:18:15+5:30
शालेय शिक्षण विभागाची माहिती; ४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची उपस्थिती लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यातील ११ हजार २९६ शाळा ...

राज्यातील ११ हजार शाळा सुरू
शालेय शिक्षण विभागाची माहिती; ४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची उपस्थिती
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील ११ हजार २९६ शाळा सुरू झाल्या असून ९ वी ते १२ वीच्या वर्गातील ४ लाख ८८ हजार २२२ विद्यार्थी शाळेत उपस्थित राहत असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागाने दिली.
२३ नोव्हेंबरला राज्यातील शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सुुरुवातीला विद्यार्थी उपस्थिती बेताचीच असणाऱ्या शाळांत आता विद्यार्थी उपस्थितीत वाढ झाली असून ही वाढ १ लाख ८९ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची आहे. मात्र राज्यातील ७ जिल्ह्यांत अद्यापही शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
गडचिरोली, उस्मानाबाद, सातारा, सोलापूर, लातूर, चंद्रपूर, धुळे, नांदेड या जिल्ह्यांतील शाळा सुरू होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांहून अधिक आहे. तर अकोला, यवतमाळ,जालना, औरंगाबाद, नंदुरबार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वर्धा या जिल्ह्यांतील शाळा सुरू होण्याची प्रमाण ६० टक्क्यांहून अधिक आहे. शाळा सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढत असून पालकांचीही त्यांना शाळेत पाठविण्याची मानसिक तयारी होत असल्याचे चित्र आहे.
* शैक्षणिक नुकसान टाळणे गरजेचे
गेल्या दहा दिवसांत उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याचे दिसते. कोणत्याही प्रकारच्या तक्रारी उद्भवलेल्या दिसत नाहीत. या पार्श्वभूमीवर ज्या ठिकाणी अजून शाळा सुरू झाल्या नाहीत, तिथे त्या सुरू होऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळले पाहिजे. तसेच प्रचलित पद्धतीनुसारच दहावी आणि बारावीच्या परीक्षा आयोजित होणे अपेक्षित आहे, असे मत शिक्षणतज्ज्ञ वसंत काळपांडे यांनी मांडले.
* अडीच हजार शिक्षक, कर्मचाऱ्यांना काेरोना
२३ नोव्हेंबर रोजी शाळा सुरू झाल्या तेव्हा १,३५३ शिक्षकांना काेरोनाची लागण झाली होती. तसेच एकूण ९६, हजार ६६६ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी ४४ हजार ३१३ कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी २९० कर्मचाऱ्यांना लागण झाली होती. नवीन माहितीनुसार आता १० दिवसानंतर २,२१२ शिक्षक, तर ६८२ शिक्षकेतर कर्मचारी काेराेना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
...............................
कोट
बुधवारी रात्रीपर्यंत राज्यातील ९ ते १२वी गटातील ११,२९६ शाळा सुरू आहेत. कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करीत सुमारे ५ लाख विद्यार्थी उत्साहाने उपस्थित आहेत. यासाठी स्थानिक प्रशासन, विद्यार्थी, पालक व शिक्षक यांचे सहकार्य महत्त्वाचे आहे
- वर्षा गायकवाड, शालेय शिक्षणमंत्री