११ वर्षांचा यशस्वी लढा !

By Admin | Updated: March 12, 2015 01:19 IST2015-03-12T01:19:32+5:302015-03-12T01:19:32+5:30

डायलेसिसवरील रुग्ण हा मरणपंथाला लागलेला रुग्ण असा सर्वसाधारण समज आहे. पण या समजाला छेद दिला तो एक महिलेने.

11 years of successful fight! | ११ वर्षांचा यशस्वी लढा !

११ वर्षांचा यशस्वी लढा !

पूजा दामले, मुंबई
डायलेसिसवरील रुग्ण हा मरणपंथाला लागलेला रुग्ण असा सर्वसाधारण समज आहे. पण या समजाला छेद दिला तो एक महिलेने. तब्बल ११ वर्षांपासून डायलेसिसवर असूनही ही महिला सर्वसाधारण आनंदी जीवन जगत आहे. हा प्रवास अन्य रुग्णांसाठीदेखील प्रेरणादायी असाच आहे.
संघर्षमय प्रवासाची कहाणी सांगताना कल्याणच्या सुशीला (नाव बदललेले) म्हणाल्या, ‘दुसऱ्यांदा गर्भधारणा झाल्यावर तीन महिन्यांनी डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेले. काही तपासण्यांमध्ये किडनीचा आजार झाल्याचे निदान झाले. त्या वेळी आजार वाढत होता. मला तत्काळ डायलेसिस सुरू करावे लागणार होते. ही गोष्ट आहे ११ वर्षांपूर्वीची. तो काळ खूप कठीण होता. पण पतीच्या आणि मुलीच्या साथीने गेली ११ वर्षे मी डायलेसिसवर असूनही माझे जीवन सर्वसामान्यांप्रमाणे जगत आहे.’
सुशीला पुढे म्हणतात, ‘गरोदर असतानाच अचानक किडनीचा आजार उद्भवल्याने हादरून गेले. मी मुलाला जन्म देऊ शकणार नाही, याचे दु:ख. तर दुसरीकडे डायलेसिस करावे लागणार या भीतीने मन पोखरून गेले होते. त्या वेळी पुढे काय होणार हे काहीच माहीत नव्हते. पतीने दिलेली साथ मोलाची ठरली. तेव्हा माझी मुलगी ५ वर्षांची होती. पतीच्या पगारावरच घरखर्च सुरू होता. त्यातच भर पडली डायलेसिसच्या खर्चाची. गेल्या ११ वर्षांत अनेक कठीण प्रसंग आले. पण सर्वांच्या साथीमुळे मी त्यातून बाहेर पडले. मी घरातली सगळी कामे रोज करते. डायलेसिससाठी कल्याणहून एकटी बॉम्बे रुग्णालयात येते. सीएसटी स्थानकापासून मी बॉम्बे रुग्णालयापर्यंत चालत जाते. आठवड्यातून दोन वेळा मला डायलेसिस करावे लागते. डायलेसिसच्या दिवशी सकाळी पावणेचारला उठून मी स्वयंपाक करून घरातून निघते. दुपारी अडीचच्या सुमारास घरी पोहोचल्यावर थोडी विश्रांती घेऊन, रात्रीचा स्वयंपाक करते. चांगले राहण्यासाठी आवश्यक तितके पाणी मी न चुकता पिते. दरवर्षी पाच दिवसांसाठी मी गावाला जाते. गावाहून येताना माझे पती आणि मुलगी कल्याणला उतरतात. मी सीएसटीला उतरून डायलेसिस घेऊन घरी येते. पैशांचा प्रश्न येतो, पण तरीही कुठून ना कुठून मदत मिळतेच. योग्य उपचार, आहार, व्यायाम केल्यास डायलेसिसवरची व्यक्ती सामान्यपणे आयुष्य जगू शकते. कुटुंबीयांबरोबरच समाजाने डायलेसिसवर असणाऱ्यांना साथ दिली तर त्यांना त्रास होणार नाही, माझ्याप्रमाणे इतरही लोक आनंदाने आयुष्य जगू शकतात, असा मोलाचा सल्लाही सुशीला देतात.

Web Title: 11 years of successful fight!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.