पालिकेचे ११ हजार कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 01:22 IST2019-03-14T01:22:29+5:302019-03-14T01:22:45+5:30
प्रशासनाचे कामकाज थंडावणार; आचारसंहितेची अंमलबजावणी

पालिकेचे ११ हजार कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त
मुंबई : लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यामुळे लवकरच महापालिकेचे कर्मचारीही या कामात रुजू होणार आहेत. तब्बल ११ हजार कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त राहणार असल्याने विभाग कार्यालय, विविध विभागांचे कामकाजही थंडावणार आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणुकीच्या कामासाठी आपल्या कर्मचाऱ्यांना पाठविणे बंधनकारक आहे. आगामी लोकसभा निवडणुकीची तारीख नुकतीच जाहीर झाली आहे. रविवारपासून आचारसंहिताही लागू झाल्यामुळे सर्वच विकास कामे थंडावली आहेत.
मवारी महापालिकेने मुंबईत झळकणारी राजकीय पक्षांची होर्डिंग्स काढण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर महापालिकेतील निवडणुकीचे कार्यालयही आता जोमाने कामाला लागले आहेत. आचारसंहितेची अंमलबजावणी काटेकोरपणा होईल, यासाठी पालिका निवडणूक कार्यालयाला डोळ्यांत तेल घालून काम करावे लागणार आहे.
त्यातच पालिकेचे सुमारे ११ हजार कर्मचारी लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी पाठविण्यात आले आहेत. आरोग्य, कीटक नाशक विभागासह सामान्य प्रशासन विभागातील शेकडो कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी वर्ग गेल्यामुळे पालिकेच्या दैनंदिन कामांवर त्याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
निवडणूक आयोगाच्या आदेशाचे पालन
निवडणूक आयोगाच्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक असते. आदेश नाकारणाºया संबंधित अधिकाºयावर गुन्हा नोंद होणे, अटक होणे अशी कारवाई होऊ शकते. ११ हजार कर्मचारी निवडणूक कामासाठी पाठविण्यात आले, नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्यात येईल, अशी हमी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.