Join us
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्यास ११ लाख बक्षीस; शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचे वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2024 06:12 IST

बुलढाण्यात गुन्हा दाखल

बुलढाणा/मुंबई : शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्यास ११ लाखांचे बक्षीस देऊ, असे वादग्रस्त विधान सोमवारी बुलढाणा येथे केले. त्याचा काँगेस पक्षाने आक्रमक समाचार घेतला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप आरक्षण तथा संविधान संपवत असल्याचा नकारात्मक प्रचार काँग्रेसने केला होता. परंतु, राहुल गांधी यांच्या आरक्षणविरोधी वक्तव्यामुळे काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला, असे ते म्हणाले. गायकवाड यांच्याविराेधात पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका करताना राज्यातील महायुतीच्या नेत्यांची जीभ पुन्हा एकदा घसरल्याचे सोमवारी बघायला मिळाले.  गायकवाड यांच्याशिवाय शिंदेसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर या आणखी दाेन नेत्यांनीही बेताल विधाने केली आहेत. 

निष्ठा शब्द तुमच्यासाठी विष्ठेसारखा झाला आहे

छ. संभाजीनगर : निष्ठेबद्दल बोलायची उद्धव ठाकरेंची लायकी नाही. काँग्रेस राष्ट्रवादीचे पाय चाटणे, त्यांच्या घरात जाणे ही निष्ठा आहे? निष्ठा हा शब्द आता तुमच्यासाठी विष्ठेसारखा झाला आहे, असे वक्तव्य संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रपरिषदेत केले. तुमच्या तोंडात आता फक्त विष्ठा आहे. आता तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांचे पाय चाटा. ते जे देतील ते आपल्या झोळीत टाकून घ्या, असेही शिरसाट म्हणाले.

पवारांमुळे महाराष्ट्राला जातीयवादाचा कॅन्सर

मुंबई : शरद पवारांमुळे फक्त महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादाचा कॅन्सर झाला आहे. ५०-६० वर्ष पवारांच्या हातामध्ये महाराष्ट्राची सत्ता होती. त्यांनी फक्त महाराष्ट्र लुटायचे काम केले आहे, असे वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी ‘एक्स’वर केले. पवारांचा सत्ताकाळ म्हणजे इतिहासातील काळीकुट्ट कुठे पाने होती. पवारांना महाराष्ट्रामध्ये जातीयवाद निर्माण करायचा आहे का? असा प्रश्न त्यांनी विचारला.

टॅग्स :संजय गायकवाडशिवसेना