मुंबईबाहेरून येणाऱ्या नागरिकांसाठी १०८ सार्वजनिक शौचालये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:09 IST2021-02-06T04:09:06+5:302021-02-06T04:09:06+5:30
पालिका प्रशासनाचे नियाेजन; ३१ डिसेंबरपूर्वी २०,३०१ शौचकुपे बांधण्याचे उद्दिष्ट लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : सार्वजनिक ठिकाणी शौचालयांची कमतरता ही ...

मुंबईबाहेरून येणाऱ्या नागरिकांसाठी १०८ सार्वजनिक शौचालये
पालिका प्रशासनाचे नियाेजन; ३१ डिसेंबरपूर्वी २०,३०१ शौचकुपे बांधण्याचे उद्दिष्ट
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सार्वजनिक ठिकाणी शौचालयांची कमतरता ही नेहमी चिंतेची बाब ठरली आहे. ठाणे, पुणे, कर्जत, नवी मुंबई, भाईंदर, विरार आदी भागांमधून मुंबईत दररोज किमान ४० लाख नागरिक नोकरी, व्यवसाय, रोजंदारीसाठी ये-जा करीत असतात. त्यांची गैरसोय दूर करण्यासाठी १०८ सार्वजिनक शाैचालये बांधण्यात येणार आहेत, तर ३१ डिसेंबर २०२१ पूर्वी २०,३०१ शौचकुपे बांधण्याचे पालिकेचे उद्दिष्ट आहे.
मुंबईतील लोकसंख्येच्या तुलनेत शौचालय अत्यल्प आहेत. महिलांसाठी सार्वजनिक प्रसाधनगृहांची संख्या अत्यंत कमी आहे. त्यामुळे दररोज कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या चाकरमान्यांची प्रचंड गैरसोय होत असते. वस्ती स्वच्छता कार्यक्रमांतर्गत मुंबईत एकूण २२,७७४ शौचकुपे आहेत. त्यापैकी ८,६३७ नवीन असून १४,१३७ शौचकुपे जुनी आहेत. त्यांचे पुनर्बांधकाम करण्यात येईल. आतापर्यंत ४,५९६ शौचकुपे बांधून पूर्ण झाली असून १५,७०५ शौचकुपांचे काम सुरू आहे.
* ३२३ कोटींची तरतूद
लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांची अडचण लक्षात घेता त्यांच्यासाठीही अत्याधुनिक सुविधांसह पाश्चात्त्य पद्धतीच्या शौचालयात वेगळ्या शौचकुपांची व्यवस्था करण्यात येईल. तसेच ट्रान्सजेंडर संवेदनशील शौचालयेही बांधण्यात येतील. काही शौचालये ही भागीदारी तत्त्वावर, तर काही पालिकेतर्फे बांधण्यात येतील. यासाठी ३२३ कोटींची तरतूद आगामी आर्थिक वर्षात करण्यात आली आहे.
* पावसाचे पाणी साठवणार
नव्याने बांधण्यात येणाऱ्या शौचालयांच्या ठिकाणी पावसाचे पाणी साठवण्यात येईल. शौचालयात पुरेशी प्रकाश व्यवस्था, वॉशबेसीन, सुका कचरा व ओला कचरा टाकण्यासाठी कचराकुंड्या आणि सॅनिटरी पॅडची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.
..................