Join us

... जेव्हा १०० अधिकारी सीनियर पीआय बनतात; क्रीम पोस्टिंगमुळे खुर्ची सुटेना म्हणून बढत्यांनाही लागायचा ब्रेक

By मनीषा म्हात्रे | Updated: August 16, 2025 10:37 IST

बदल्यांमुळे काही अधिकाऱ्यांना मिळाला दिलासा

मनीषा म्हात्रे 

मुंबई : मुंबई पोलिस दलासाठी यंदाचा रक्षाबंधन सण अधिकच खास ठरला. तब्बल १०० पोलिस निरीक्षकांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक (सिनिअर पीआय) पदावर बढती देण्यात आली. हा निर्णय मुंबई पोलिस दलात मोठ्या बदलांची नांदी ठरत आहे. यासोबतच सहायक पोलिस आयुक्त पदासाठीदेखील ३० अधिकाऱ्यांची निवड झाली असून, त्यांची नवीन नेमणूक केली आहे. अनेक वर्षापासून रखडलेल्या बढत्या आणि बदल्यांना अखेर गती मिळाल्याने काही पोलिस अधिकाऱ्यांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला आहे.

वर्षानुवर्षे अनेक पोलिस अधिकारी बढतीच्या प्रतीक्षेत होते आणि आहेत. काहींना विभागीय चौकशी, सेवा रेकॉर्डमधील धील अडचणी किंवा प्रशासनाच्या तसेच राजकीय घडामोडीने पदोन्नती मिळेल की नाही याबाबत अनिश्चितता होती. त्यामुळे निवृत्तीच्या उंबरठ्चावर अनेक अधिकारी अजूनही वरिष्ठ पदाच्या संधीची वाट पाहत होते. अनेकदा वरिष्ठ पोलिस निरीक्षक सहायक आयुक्त (एसीपी) पदावर बढती मिळविण्याऐवजी, वरिष्ठ निरीक्षक म्हणूनच काम करण्यास प्राधान्य देतात. वरिष्ठ निरीक्षक म्हणून थेट नियंत्रण, स्थानिक प्रभाव आणि अधिकार अधिक असतो. त्यामुळे अनेक अधिकारी एसीपीच्या प्रशासकीय भूमिकेपेक्षा वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदावर राहणे पसंत करतात. मात्र, यामुळे पदोन्नतीच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात.

अनेक अंमलदारही अधिकारी बनल्याने त्यांच्यासह कुटुंबीयही भाऊक झाले असून, प्रशासनाकडून अशीच सकारात्मक पावले यापुढेही अपेक्षित असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

या कारणांमुळे बढतीला अनेकांचा नकार

 गेल्या वर्षात यासंदर्भात सरकारने कडक भूमिका घेतली असून, पदोन्नती नाकारणाऱ्यांना गैर-कार्यकारी पदांवर बदली करण्याचा इशारा दिला आहे. अनेकजण 'क्रिम पोस्टिंग' म्हणून वरिष्ठ निरीक्षक पद मानतात आणि त्यामुळे ते प्रशासकीय भूमिकेत बदल करण्यास कचरतात. २०२२- २३ मध्ये ७५ वरिष्ठ निरीक्षकांनी बढती नाकारल्याने गृहविभागाने त्यांना कारवाईचा इशारा दिला होता. नुकत्याच झालेल्या आदेशातही बढती नाकारणाऱ्या २३ अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली.

महिनाभरात बढतीचे सकारात्मक वारे वाहत आहेत. रक्षाबंधनाला एकाच वेळी १०० पोलिस निरीक्षक सिनिअर पीआय झाल्याने त्यांच्या आनंदात भर पडली. तसेच ३० अधिकाऱ्यांना सहायक पोलिस आयुक्त पदावर बढती देण्यात आली. गुन्हे शाखेसाठी चार सहाय्यक पोलिस आयुक्तांची नेमणूक विशेष महत्त्वाची मानली जात आहे. मुंबईबाहेरही काही अधिकाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. वाढीव जबाबदाऱ्या, बदल्यांचे नियोजन आणि पदोन्नतीच्या संधींमुळे पोलिस दलात नवचैतन्य संचारले आहे. 

टॅग्स :मुंबई पोलीसमहाराष्ट्र