शिस्तीच्या प्रवासाचे १०० दिवस
By Admin | Updated: January 22, 2015 01:45 IST2015-01-22T01:45:25+5:302015-01-22T01:45:25+5:30
ऐन गर्दीच्या वेळी ठाण्यातून मुंबईला जाण्यासाठी लोकलमध्ये चढण्याची धावपळ पाहिली की, कोणालाही हा प्रवास अगदी नकोसा होतो.

शिस्तीच्या प्रवासाचे १०० दिवस
जितेंद्र कालेकर - ठाणे
ऐन गर्दीच्या वेळी ठाण्यातून मुंबईला जाण्यासाठी लोकलमध्ये चढण्याची धावपळ पाहिली की, कोणालाही हा प्रवास अगदी नकोसा होतो. परंतु, प्रत्येकाने शिस्त पाळली तर गाडीत चढणाऱ्या आणि उतरणाऱ्यांचीही सोय होऊ शकते. ठाण्यातून मुंबई उच्च न्यायालयात जाणाऱ्या न्यायाधीश महोदयांनी हे सिद्ध करून दाखवले. त्यांच्या या शिस्तीच्या प्रवासाला बुधवारी १०० दिवस झाले. हाच ‘शतकमहोत्सव’ बुधवारी या प्रवाशांनी ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्र. ७ वर साजरा केला.
१० वर्षांपूर्वी ठाणे ते छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) ही लोकल फलाट क्र. ७ वरून सुरू झाली. ९.१९च्या गाडीने प्रवास करणारे मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश दिलीप मुरूमकर आणि मुंबईला नियमित जाणारे व्यापारी जयंतीभाई सतरा यांनी यासाठी पुढाकार घेतला. त्याला मुंबई शहर दिवाणी व सत्र न्यायाधीश विजय शेवाळे, व्यावसायिक सुरेंद्र भगत, विनोद अग्रवाल, काळबादेवी पारसिक बँकेचे व्यवस्थापक भगवंत खरपुडे, मुंबईचे पोलीस निरीक्षक वसंत बोरुगुडे यांनी प्रतिसाद दिला. १७ आॅक्टोबरपासून या लोकलसाठी डाऊन बाजूकडील प्रथम श्रेणीच्या डब्याला रांगा लागू लागल्या. ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना जागाही मिळत नव्हती. त्यामुळे रांगेतच चढायचा निर्धार केल्याचे न्या. मुरूमकर यांनी सांगितले.
महिला प्रवाशांकडून प्रेरणा
आिजारी आणि गरोदर महिलांना होणारा त्रास टाळण्यासाठी आधी महिलांनी १० वर्षांपूर्वी अशीच रांगेची शिस्त या गाडीसाठी सुरू केल्याचे प्रथम वर्गाच्या प्रवासी मृदुला कुलकर्णी, अलका करंदीकर यांनी सांगितले. त्यांचेच अनुकरण करण्याचा विचार दिलीप मुरूमकर व जयंतीभाई सतरा यांनी केला आणि ही नवी व्यवस्था सुरू केली.