शपथविधीत शतप्रतिशत भाजपा!
By Admin | Updated: October 31, 2014 01:31 IST2014-10-31T01:31:07+5:302014-10-31T01:31:07+5:30
शुक्रवारी होणा:या शपथविधी सोहळ्यात ‘शतप्रतिशत भाजपा’ हेच सूत्र ठेवत शिवसेनेच्या एकाही आमदाराला कोणत्याही परिस्थितीत शपथ द्यायची नाही,

शपथविधीत शतप्रतिशत भाजपा!
अतुल कुलकर्णी - मुंबई
शुक्रवारी होणा:या शपथविधी सोहळ्यात ‘शतप्रतिशत भाजपा’ हेच सूत्र ठेवत शिवसेनेच्या एकाही आमदाराला कोणत्याही परिस्थितीत शपथ द्यायची नाही, असे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी ठरवले आहे. युती आणि आघाडी तोडण्यापासून ते शिवसेनेला शपथविधी सोहळ्यापासून दूर ठेवण्यार्पयतची ही सगळी विचारपूर्वक केलेली खेळी आहे, असेही एका नेत्याने स्पष्ट केले.
एकीकडे आमची बोलणी चालू आहेत, असे सांगायचे आणि दुसरीकडे बोलणी तर फार दूरची गोष्ट, पण दोन ओळींचादेखील प्रस्ताव पाठवायचा नाही, असे सूत्र भाजपाने अवलंबले आहे. राजीवप्रसाद रुडी आणि जे.पी. नड्डा यांनी आमची बोलणी सकारात्मक चालू आहे, असे जरी सांगितले असले तरी अशी कोणतीही बोलणी कोणासोबतही झालेली नाही. सुभाष देसाई दिल्लीत गेल्यानंतर त्यांना ‘आपण कोण’ ही ओळख द्यावी लागली होती.
नाही म्हणायचे नाही आणि काही करायचेही नाही, अशी रणनीती भाजपाने आखली आहे. त्यामुळे बोलावे तरी पंचाईत आणि नाही बोलावे तर शरणागती पत्करल्याचा ठपका, अशा कात्रीत सेना सापडली आहे. विश्वासदर्शक ठराव मान्य झाला की सरकारला सहा महिन्यांचा वेळ मिळतो. तोर्पयत पुलाखालून बरेच पाणी वाहून जाईल. राजकीय घडामोडी घडतील, असेही भाजपाचे नेते खासगीत सांगत आहेत.
युती तुटावी यासाठीच निवडणुकीच्या आधी प्रयत्न केले गेले होते. भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने बोलणी कशा पद्धतीने झाली याचा गौप्यस्फोट केला. शिवसेनेसोबत चर्चेला जाताना रडत-रडत आत जायचे, बाहेर आल्यानंतरदेखील आपण कसे युती करण्यास उत्सुक आहोत, हे रडवेल्या चेह:याने सांगायचे आणि आतमध्ये चर्चा करताना मात्र युती तुटेल इतपत ताठर भूमिका घ्या, अशा सूचना भाजपा नेत्यांना करण्यात आल्या होत्या. परिणामी युती तुटली.
त्याआधी भाजपाने सव्र्हे
करून घेतला होता व त्यांना स्वत:ला सव्वाशे जागा मिळतील, असे अपेक्षित होते म्हणूनच हे केले गेले. आतादेखील विश्वासदर्शक ठराव मंजूर केल्यानंतर राजकीय गणिते मांडून शिवसेनेबाबतचा निर्णय घ्यायचा, अशी रणनीती आखण्यात आली
आहे.
सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेकडून भाजपाला कोणतीही माफी नको आहे, भाजपाचे मन खूप मोठे आहे, असे सांगत शिवसेनेला डिवचण्याचे काम केले. शिवसेनेतर्फे आदित्य ठाकरे यांना चर्चेला पाठवले गेले होते. त्यावर प्रकाश जावडेकर यांनी त्यांच्याकडे कदाचित तेवढेच एक प्रगल्भ नेतृत्व असेल, अशी बोचरी प्रतिक्रिया दिली होती. या पाश्र्वभूमीवर शिवसेनेने सत्तेसाठी लांगूनचालन करण्यापेक्षा विरोधात बसावे, अशी शिवसैनिकांची भावना आहे.