पनवेल चर्च दगडफेकप्रकरणी १० हजारांचे बक्षीस
By Admin | Updated: March 24, 2015 01:53 IST2015-03-24T01:53:35+5:302015-03-24T01:53:35+5:30
सेंट जॉर्ज चर्चवर दगडफेक करणाऱ्यांबाबत माहिती देणाऱ्यांना पोलिसांकड़ून दहा हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

पनवेल चर्च दगडफेकप्रकरणी १० हजारांचे बक्षीस
पोलीस आयुक्तांची माहिती
पनवेल : सेंट जॉर्ज चर्चवर दगडफेक करणाऱ्यांबाबत माहिती देणाऱ्यांना पोलिसांकड़ून दहा हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. त्याचबरोबर तपासासाठी पाच पथके नियुक्त केली असून आरोपींचे रेखाचित्र तयार करण्यात आल्याची माहिती नवी मुंबईचे पोलीस आयुक्त के. एल. प्रसाद यांनी दिली.
नवीन उड्डाणपुलाजवळील चर्चवर शुक्रवारी दगड फेकून
तोडफोड करण्यात आली होती. त्यात दर्शनी भागातील सेंट जॉर्ज पुतळयाच्या समोर लावलेल्या शोकेसच्या काचा फुटल्या. या प्रकरणाचे पडसाद राज्यातच नाही तर देशभर उमटले. या घटनेची राज्य सरकारने सुध्दा गंभीर दखल घेतली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची चौकशी करण्याचीे आश्वासन दिले आहे. दोन दिवस उलटूनही या प्रकरणाची उकल न झाल्याने नाराजी व्यक्त केली आहे. सीसी टीव्ही फुटेज अस्पष्ट असल्याने अडथळे येत आहेत.
पोलीस आयुक्त के. एल. प्रसाद यांनी चर्चला भेट देऊन फादर व मेंबर्सशी चर्चा केली. संशयीत आरोपी पकडल्याच्या वृत्ताचे त्यांनी खंडन केले. या घटनेला धार्मिक रंग देणे चुकीचे आहे, असे ते म्हणाले. रेखाचित्र तयार केले असले, तरीही दडगफेक करणारे अलर्ट होऊ नयेत म्हणून ते प्रसिध्द करण्यात येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.