Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘परे’च्या १० लोकल आता १५ डब्यांच्या; १ ऑक्टोबरपासून होणार अंमलबजावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 09:59 IST

चर्चगेट ते विरारदरम्यान १५ डब्यांच्या लोकल फेऱ्यांमध्ये वाढ होणार आहे. यामुळे विरार ते चर्चगेट असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळेल.

महेश कोलेमुंबई -  पश्चिम रेल्वे मार्गावर १ ऑक्टोबरपासून १२ डब्यांच्या १० गाड्यांचे रुपांतर १५ डब्यांत करण्यात येणार असून, त्यामध्ये १२ फेऱ्यांची संख्याही वाढविली जाणार आहे. यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गर्दी कमी होईल आणि अधिकाधिक प्रवाशांना वेळेत प्रवास करता येईल.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या पश्चिम रेल्वे मार्गावर दिवसाला १५ डब्यांच्या १९९ फेऱ्या धावत आहेत. १ ऑक्टोबरपासून यात वाढ होईल आणि त्यानुसार, १२ डब्यांच्या १० लोकल १५ डब्यांच्या केल्या जाणार असून, १२ अतिरिक्त फेऱ्यांमध्ये देखील वाढ होणार आहे. त्यामुळे आता १५ डब्यांच्या एकूण  २०९ इतक्या फेऱ्या होणार आहेत. या लोकल अप आणि डाऊन अशा दोन्ही दिशेला धावणार असून, या वाढीव फेऱ्यांमुळे पश्चिम रेल्वेवरील फेऱ्यांची संख्या १३९४ वरून आता १४०६ होईल. पूर्वी सीएसएमटी - बोरिवली हार्बर मार्गावर वापरण्यात येणारा रेक चर्चगेट-विरार मार्गावर पुन्हा पाठविण्यात येणार असल्याने चर्चगेट ते विरारदरम्यान १५ डब्यांच्या लोकल फेऱ्यांमध्ये वाढ होणार आहे. यामुळे विरार ते चर्चगेट असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळेल.

मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर आजघडीला धावणाऱ्या लोकल फेऱ्यांची संख्या वाढविण्यात यावी, यासाठी रेल्वे प्रवासी संघटना सातत्याने आवाज उठवत आहेत. मात्र, प्रशासन त्याकडे लक्ष देत नाही. पश्चिम रेल्वे १५ डब्यांच्या गाड्या चालवत असले, तरी मध्य रेल्वेवरील १५ डब्यांच्या गाड्यांचे रडगाणे सुरूच असल्याचे रेल्वे प्रवासी संघटनांनी सातत्याने निदर्शनास आणून दिले आहे.

टॅग्स :पश्चिम रेल्वे