Join us

राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 06:01 IST

जानेवारीमध्ये परिवहन विभागाने १०० दिवसांचा कार्यक्रम जाहीर केला होता.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात ३८ ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक उभारण्यासाठी परिवहन विभागाने मे महिन्यामध्ये निविदा प्रक्रिया राबविली होती. त्यानुसार आता कंत्राटदारांची नेमणूक करण्यात येत आहे. रॉझमार्टा या संस्थेला राज्यातील १० प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये (आरटीओ) ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा’ या तत्त्वावर हे ट्रॅक उभारण्याचे काम देण्यात आले आहे. पाच वर्षांच्या कालावधीसाठी याची मालकी संस्थेकडे राहणार असून त्यानंतर ती आरटीओला मिळणार आहे. यासाठी १६६.६९ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. 

जानेवारीमध्ये परिवहन विभागाने १०० दिवसांचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यामध्ये राज्यात ३८ ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक उभारण्यात येणार असल्याचे परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी सांगितले होते. वाहन चालविण्याचा परवाना म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आरटीओमार्फत घेण्यात येत असलेल्या मोटार ड्रायव्हिंग चाचणीमध्ये खूप कमी उमेदवार नापास होत आहेत, ही चिंताजनक बाब असून यामध्ये सुधारणा होणे अपेक्षित असल्याचे त्यावेळी भिमनवार सांगितले होते. पुण्यामध्ये पहिला ट्रॅक तयार करण्यात आला असून त्या ठिकाणचे निकाल चांगले असल्याचे ते म्हणाले होते.   

२८ आरटीओसाठी अगोदरच कंत्राट

मुंबई महानगरातील आरटीओसह इतर जिल्ह्यातील २८ आरटीओसाठी अगोदरच कंत्राटदार नेमण्यात आला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आता सिंधुदुर्ग, सांगली, अकलूज, धाराशीव, जालना, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, भंडारा आणि गडचिरोली या १० ठिकाणी टेस्ट ट्रॅक उभारण्यासाठी आता रॉझमार्टा या संस्थेला नेमण्यात आले आहे. 

असे असतील चाचणी ट्रॅक पूर्णपणे ऑटोमेटेड, व्हिडिओ ॲनालिटिक्स-आधारित ड्रायव्हिंग चाचणी ट्रॅक चालकांच्या मूल्यांकनांमध्ये मानवी पक्षपात दूर करण्यासाठी डिझाइन करण्यात येणार ड्रायव्हिंग कौशल्यांचे रिअल-टाइम, पारदर्शक मूल्यांकनचेहरा ओळखून अर्जदार पडताळणी शक्य

टॅग्स :आरटीओ ऑफीस