डोंबिवलीत १ हजार ग्राहकांचे फोन बंद
By Admin | Updated: December 14, 2014 23:21 IST2014-12-14T23:21:16+5:302014-12-14T23:21:16+5:30
शहरात ठिकठिकाणी कॉंक्रीटीकरणाचे काम सुरू असल्याने वाहतूक व्यवस्थेचा पुरता बोऱ्या उडाला आहे.

डोंबिवलीत १ हजार ग्राहकांचे फोन बंद
डोंबिवली : शहरात ठिकठिकाणी कॉंक्रीटीकरणाचे काम सुरू असल्याने वाहतूक व्यवस्थेचा पुरता बोऱ्या उडाला आहे. या कामासाठी रस्ते खोदल्याने भूमिगत वीज आणि दूरध्वनी वाहिन्या तुटल्यामुळे कंपन्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आधी महावितरणने लाखो रुपयांची तर त्या पाठोपाठ आता बीएसएनएलने कोट्यवधींची नुकसानभरपाई महापालिकेकडे मागितली आहे. पालिका अधिकाऱ्यांचे कंत्राटदारांकडे लक्ष नसल्याने ते बेपर्वाईने काम करतात, असा आरोप बीएसएनएल अधिकाऱ्यांनी केला आहे.
डोंबिवलीत १४ ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू असून कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे वाहिन्या तुटत आहेत. पत्रव्यवहार करूनही पालिका प्रशासन लक्ष देत नाही. केबल दुरुस्तीचे काम केले की पुन्हा त्यात बिघाड होतो. यामुळे बीएसएनएलचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. याविषयी बीएसएनएलचे कल्याण विभागाचे उपमहाव्यवस्थापक व्ही. एन. सावदेकर म्हणाले, या परिस्थितीला प्रशासनच जबाबदार असून नुकसान भरपाई त्यांनीच देणे अपेक्षित आहे.आहे. काम सुरू असताना पालिकेने आम्हाला कल्पना दिली असती तर आमची यंत्रणा कामाल लावून त्याबाबत काळजी घेण्यात आली असती़ मात्र पालिकेच्या अधिकाऱ्यांसह कंत्राटदारदेखील याबाबत कळवण्याची तसदी घेत नसल्याचे सांगितले. या सर्वावरुनच पालिका काम करतांना अन्य संबंधित यंत्रणांशी समन्वय का साधत नाही असा सवालही संतप्त ग्राहकांनी केला.
खा. शिंदे कार्यक्रम कसले साजरे करता? - रस्त्याच्या निकृष्ट कामाविषयी नागरिकांच्या तक्रारी मोठ्या संख्येने आल्या असून याविषयी खासदार शनिवारी पालिकेसह बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगण्यात आले़ मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही. संध्याकाळी एका फंक्शनला येणार असे माहिती असल्याने शहरातील असंख्य ग्राहकांचा/मतदारांच्या अपेक्षा वाढल्या होत्या, मात्र त्या सपशेल फोल ठरल्या. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी होती. (प्रतिनिधी)