शिवणसई शाळेत ११० विद्यार्थ्यांना १ शिक्षक
By Admin | Updated: February 27, 2015 22:43 IST2015-02-27T22:43:37+5:302015-02-27T22:43:37+5:30
वसई पंचायत समिती अंतर्गत असलेल्या शिक्षण विभागाच्या कारभारात अद्याप सुधारणा होऊ शकली नाही. आजही अनेक शाळा एक शिक्षकी असून विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे

शिवणसई शाळेत ११० विद्यार्थ्यांना १ शिक्षक
दीपक मोहिते, वसई
वसई पंचायत समिती अंतर्गत असलेल्या शिक्षण विभागाच्या कारभारात अद्याप सुधारणा होऊ शकली नाही. आजही अनेक शाळा एक शिक्षकी असून विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वसई पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापतींनी काही शाळांना भेट देऊन पाहणी केली असता अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या.
ज्या शाळेत ३ ते ४ शिक्षकांची आवश्यकता आहे त्या शाळेत केवळ १ शिक्षिका कार्यरत आहे. शिवणसई येथील जिल्हापरिषदेच्या शाळेत पटावर ११० विद्यार्थी असून येथे ३ शिक्षकांची आवश्यकता असताना केवळ १ शिक्षिका ज्ञानदानाचे काम करीत आहे. तर उसगांव येथे मात्र नेमके उलटे चित्र आहे. या जिल्हापरिषद शाळेत २० विद्यार्थी पटावर आहेत त्यापैकी १६ विद्यार्थी स्थलांतरीत झाल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. परंतु या शाळेत २ शिक्षक कार्यरत आहेत. अनेक शाळांमध्ये अशी परिस्थिती असल्यामुळे जिल्हापरिषद शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये गळतीचे प्रमाण वाढीला लागले आहे. एका शाळेत उपसभापती जयप्रकाश ठाकूर यांनी शिक्षिकेला गटविकास अधिकाऱ्याचे नाव विचारले असता त्या शिक्षिकेने नाव माहित नसल्याचे सांगितले. काही शाळांमध्ये माहितीचे फलकही लावण्यात आलेले नाहीत. सेवानिवृत्त शिक्षकांना अद्याप गटविम्याचा फायदा देण्यात आलेला नाही. यापैकी अनेक शिक्षकांचे मृत्यूही झाले आहेत. तर दुसरीकडे १२८ सेवानिवृत्त शिक्षक आपल्या वेतनश्रेणीतील फरकासाठी गेल्या १२ वर्षापासून धडपडत आहेत. परंतु त्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही त्यामुळे या शिक्षकांची संघटना
आता आंदोलन करण्याच्या तयारीत आहे.