Join us

तिसऱ्या मुंबईसाठी १ लाख कोटी रुपये; मुंबई महानगराला जागतिक आर्थिक केंद्र करण्यासाठी होणार वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 10:10 IST

तिसरी मुंबई उभारण्यासाठी आणि मुंबई महानगर प्रदेशाच्या उत्तर आणि दक्षिण भागात विकास केंद्रे विकसित करण्यासाठी ब्रूकफील्डची ही गुंतवणूक वापरण्यात येणार आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : तिसऱ्या मुंबईच्या उभारणीसाठी १,०३,८०० कोटी रुपयांची म्हणजेच १२ अब्ज डॉलर्सची थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि ब्रूकफील्ड कंपनीत सामंजस्य करार करण्यात आला आहे. आगामी ५ ते ७ वर्षांत मुंबई महानगराला जागतिक पातळीवरील आर्थिक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी या गुंतवणुकीचा वापर करण्यात येणार आहे. 

दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक परिषदेत हा सामंजस्य करार करण्यात आला. त्यानुसार तिसरी मुंबई उभारण्यासाठी आणि मुंबई महानगर प्रदेशाच्या उत्तर आणि दक्षिण भागात विकास केंद्रे विकसित करण्यासाठी ब्रूकफील्डची ही गुंतवणूक वापरण्यात येणार आहे.  त्यामध्ये अटल सेतू आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभावित ३२३.२४ चौ. किमी क्षेत्रात वसविण्यात येणाऱ्या कर्नाळा-साई-चिरनेर या क्षेत्रांमधील तिसऱ्या मुंबईच्या नावे शहरी विकास प्रकल्पात ही गुंतवणूक केली जाणार आहे.  त्याचबरोबर मुंबई महानगर प्रदेशाच्या उत्तर भागातील १००६.७६ चौ. किमी आणि दक्षिण भागातील ६७३.३३ चौ. किमी क्षेत्रातील प्रस्तावित विशेष नियोजन क्षेत्रे (एसपीए) विकसित करण्यासाठी गुंतवणुकीचा मोठा भाग वळविण्यात येईल, असे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

गुंतवणूक कशात?मेट्रो प्रकल्प, रस्ते, पूल, शहरी पायाभूत सुविधा, रिअल इस्टेट आदींचा विकास ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट, लँड व्हॅल्यू कॅप्चर संधी यामध्ये पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे ज्या जमिनींची किंमत वाढते, त्या मूल्यवाढीतून महसूल निर्माण करण्याच्या प्रक्रियेसाठी सहकार्य शाश्वत ब्लू आणि ग्रीन पायाभूत सुविधा ज्यामध्ये जलस्रोतांशी संबंधित आणि पर्यावरणपूरक घटकांशी संबंधित पायाभूत सुविधांचा विकास करण्यावर भर दिला जाणारतिसरी मुंबई आणि विशेष नियोजन क्षेत्रांमध्ये निवासी, व्यावसायिक, मिश्र-वापर विकास प्रकल्प, लॉजिस्टिक्स पार्क, डेटा सेंटर्स, ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स (जीसीसी) यांचा समावेश. प्रत्यक्ष, डिजिटल आणि सामाजिक पायाभूत सुविधा विकास करण्यावर भर 

टॅग्स :मुंबई