विमान प्रवाशाच्या बॅगेतून १ लाख ६० हजार गायब; मुंबईतून रियाधला जाणाऱ्या तरुणाला गंडा
By मनोज गडनीस | Updated: October 24, 2023 18:24 IST2023-10-24T18:24:53+5:302023-10-24T18:24:58+5:30
सायंकाळी साडे पाच वाजता त्याचे विमान मुंबईतून रियाध येथे रवाना झाले. रियाध येथे उतरल्यानंतर त्याला केवळ एकच बॅग मिळाली

विमान प्रवाशाच्या बॅगेतून १ लाख ६० हजार गायब; मुंबईतून रियाधला जाणाऱ्या तरुणाला गंडा
मुंबई - मुंबई विमानतळावरून रियाध येथे जाणाऱ्या एका प्रवाशाच्या बॅगेतून तब्बल १ लाख ६० हजार रुपये गायब होण्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सहार पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ७ ऑक्टोबर रोजी ही घटना घडली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, नालासोपारा येथील रहिवासी असलेला २६ वर्षीय मुद्दसीर शेख हा तरुण रियाध येथे जाण्यासाठी मुंबई विमानतळावर दाखल झाला. एअर इंडियाच्या विमानाने तो रियाध येथे जाणार होता. त्याने आपल्याकडील निळ्या रंगाच्या दोन्ही ट्रॉली बॅगा चेक-इन करत विमान कंपनीच्या ताब्यात दिल्या. त्यापैकी एका बॅगमध्ये १९०० अमेरिकी डॉलर (भारतीय चलन मूल्यातील किंमत एक लाख ६० हजार रुपये) होती.
सायंकाळी साडे पाच वाजता त्याचे विमान मुंबईतून रियाध येथे रवाना झाले. रियाध येथे उतरल्यानंतर त्याला केवळ एकच बॅग मिळाली. यानंतर रियाध येथील विमानतळ प्राधीकरणाच्या अधिकाऱ्यांकडे त्याने या संदर्भात तक्रार केली. तसेच, एअर इंडियाला देखील याची माहिती त्याने कळवली होती. १० ऑक्टोबर रोजी त्याची हरवलेली बॅग सापडली व ती त्याला देण्यात आली. मात्र, ज्यावेळी त्याने आपली बॅग उघडली तेव्हा त्यामध्ये त्याचे पैसेच नसल्याचे त्याला आढळून आले. १९ ऑक्टोबर रोजी मुंबईत परतल्यानंतर त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.