Join us

इंजिनिअरिंगसाठी १.४४ लाख विद्यार्थ्यांना जागांचे वाटप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 11:58 IST

प्रवेश निश्चित न केल्यास हे विद्यार्थी कॅप फेरीतून बाहेर पडणार असून त्यांना चौथ्या फेरीनंतर कॉलेज स्तरावर प्रवेश घ्यावा लागेल.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाची गुणवत्ता यादी जाहीर केली असून कॅप प्रवेशाच्या पहिल्या फेरीत १ लाख ४४ हजार ७७६ विद्यार्थ्यांना कॉलेजमधील जागांचे वाटप करण्यात आले आहे. त्यातील १५ हजार ८५२ विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज गोठविण्यात आले असून त्यांच्यासाठी कॉलेज प्रवेशाचा हा अंतिम पर्याय आहे. प्रवेश निश्चित न केल्यास हे विद्यार्थी कॅप फेरीतून बाहेर पडणार असून त्यांना चौथ्या फेरीनंतर कॉलेज स्तरावर प्रवेश घ्यावा लागेल.

इंजिनिअरिंगसाठी कॅप प्रवेश प्रक्रिया २८ जूनपासून सुरू झाली. त्यात २ लाख १४ हजार एवढ्या विक्रमी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली.

कॅप फेरीसाठी आले १,९९,७४८ अर्ज 

१,९९,७४८ विद्यार्थ्यांनी कॅप फेरीसाठी अर्ज भरून कॉलेज पसंती क्रमांक नोंदविले. पहिल्या फेरीत यातील १,४४,७७६ विद्यार्थ्यांना जागांचे वाटप झाले आहे.

यंदा इंजिनिअरिंगच्या एकूण १,७६,०९५ जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे पहिल्या फेरीत प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील फेऱ्यांमध्ये प्रवेशाची संधी आहे. 

पहिल्या फेरीतील प्रवेशपात्र विद्यार्थ्यांना १ ते ३ ऑगस्टदरम्यान कॉलेजांमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करावे लागतील. गेल्यावर्षी इंजिनिअरिंगसाठी १,५७,२२४  जागांपैकी १,४९,०७८ जागांवर जणांनी प्रवेश घेतला. यंदा अधिक जागा भरल्या जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

टॅग्स :प्रवेश प्रक्रियामहाविद्यालयकरिअर मार्गदर्शन