मुंबई : मुंबई विमानतळावर सोन्याच्या तस्करी प्रकरणात विमानतळावर काम करणाऱ्या आणि विमानतळाबाहेर फूड स्टॉलच्या कर्मचाऱ्यासह परदेशातून आलेल्या एका व्यक्तीला सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. या कारवाईत दीड किलो सोने जप्त करण्यात आले असून, या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत एक कोटी ५ लाख रुपये इतकी आहे.
दुबईतून मुंबईत सोन्याची तस्करी होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार, संबंधित विमानातून उतरलेल्या एका प्रवाशावर अधिकाऱ्यांनी पाळत ठेवली होती. या व्यक्तीचे नाव मुशाहीद अख्तार अन्सारी असे आहे. अन्सारी मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर मोबाइल चार्जिंग पॉइंटवर मोबाइल चार्ज करत उभा राहिला. त्या दरम्यान सोनाली नावाची विमानतळावर काम करणारी तरुणी त्याच्या जवळ आली. अन्सारीने सोनालीकडे एक पाकीट दिले. हे पाकीट दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी सोनालीची चौकशी केली असता तिच्याकडे हे सोने आढळून आले. अन्सारीने आपल्याला हे सोने दिले असून, हे सोने विमानतळाच्या बाहेर फूड स्टॉलमध्ये काम करणाऱ्या तरबेज शेख याला देणार असल्याची कबुली सोनालीने दिली. त्यानंतर या तिघांनाही अटक करण्यात आली आहे.