कर्करुग्णांसाठी १ कोटीचा निधी उभारणार
By Admin | Updated: December 30, 2014 00:38 IST2014-12-30T00:38:24+5:302014-12-30T00:38:24+5:30
सारस्वत बँकेचे एकनाथ ठाकूर कर्करोगग्रस्त निधी म्हणून गौड ब्राह्मण ज्ञातीतील बांधवांच्या मदतीने जमा केला जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

कर्करुग्णांसाठी १ कोटीचा निधी उभारणार
मुंबई : देशात कर्करोगग्रस्तांची संख्या वाढत आहे. आर्थिक स्थितीमुळे या आजारावर उपचार घेणे शक्य होत नाही अशा रुग्णांना आधार म्हणून एक कोटी रुपये सारस्वत बँकेचे एकनाथ ठाकूर कर्करोगग्रस्त निधी म्हणून गौड ब्राह्मण ज्ञातीतील बांधवांच्या मदतीने जमा केला जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
निमित्त होते ते गौड ब्राह्मण सभा गिरगावच्या वतीने माटुंगा येथील यशवंत नाट्यगृहात आयोजित केलेल्या गौड ब्राह्मण त्रैमासिक अमृतमहोत्सवी सोहळ्याचे. यावेळी संस्थेसाठी ज्ञातीतील कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी निधी गोळा करण्यात मोठे योगदान असलेल्या देवदत्त आत्माराम खानोलकर यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. कोषाध्यक्ष मनीष दाभोलकर व स्थापत्यविशारद शशी प्रभू यांनी प्रत्येकी १ लाख रुपये देऊन या उपक्रमाचा शुभारंभ केला. या वेळी विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीबाबत अ. बा. तेंडुलकर, रवींद्र रामदास, ज.भ. महाजन, श्री.बा. पाटील, शेखर सामंत, विकास देसाई टोपीवाले, अमित सामंत, संतोष वायंगणकर, दीपक नाईक यांना गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी किरण ठाकूर होते तर प्रसिद्ध स्थापत्यविशारद शशी प्रभू आणि गीतकार गुरू ठाकूर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अॅनिमेशन गुरू व्ही. जी. सामंत, डॉ. जगदीश सामंत, गौड ब्राह्मण सभेचे अध्यक्ष विलास देसाई, कार्याध्यक्ष अरुण प्रभू, उमाकांत महाजन आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मराठी माणसाने सर्वच क्षेत्रे काबीज केली पाहिजेत. प्रत्येक क्षेत्रात मराठी माणसाने आपला झेंडा फडकवायला हवा, असे आवाहन लोकमान्य को. आॅ. सोसायटीचे संस्थापक किरण ठाकूर यांनी कार्यक्रमप्रसंगी केले. यावेळी उपस्थितांच्या हस्ते गौड ब्राह्मण त्रैमासिक अमृतमहोत्सवी अंकाचे प्रकाशन करण्यात आले. यंदा गौड ब्राह्मण सभेला ११७ वर्षे पूर्ण झाली आहेत. कुडाळदेशकर ज्ञातीचा इतिहास पाहून आपल्यावर खूप मोठी धुरा सोपविण्यात आल्याचे लक्षात आले. तरुणांना या क्षेत्रात यायची इच्छा असेल तर माझे नक्कीच सहकार्य लाभेल, असे आश्वासन यावेळी प्रसिद्ध गीतकार गुरू ठाकूर यांनी दिले. (प्रतिनिधी)
मठाच्या माध्यमातून एकत्र
दाभोली मठसंस्थान हे समाजाचे प्रमुख दैवतस्थान आहे. मठाच्या माध्यमातूनच समाजाला एकत्र यायचे असून आपली ताकद दाखवायची आहे. त्यामुळे सर्वांनी मिळून समाज उभारणीचे काम करू, असा निर्धार उपस्थितांनी कार्यक्रमात व्यक्त केला.
स्वर अमृताचे
आजच्या युवापिढीच्या हृदयाचा ठोका चुकविणारी एकाहून एक सरस गीते या वेळी युवा गायक नचिकेत देसाई यांनी सादर केली. त्याच्या उडत्या गीतांना रसिकांच्याही टाळ्यांचा ठेका मिळत गेला तर दुसऱ्या सत्रात आनंद भाटे आणि गायिका मंजूषा कुलकर्णी-पाटील यांनी गायलेली नाट्यगीतेही रसिकांना ताल धरायला लावणारी होती. सूत्रसंचालन मंगला खाडिलकर यांनी केले.