Daily Top 2Weekly Top 5

दैव जाणिले कुणी? केतन भाटीकर यांचे आकस्मिक निधन अन् गोव्याचे राजकारण गहिवरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 13:46 IST

भाटीकर यांचे कालचे निधन हे सर्व अर्थानी धक्कादायक आहे.

स्वकष्टाने, स्वबळावर आपले राजकीय भवितव्य घडविण्यासाठी केतन भाटीकर पुढे आले होते. दमदार, आश्वासक, सक्रिय, धडपड्या तरुण अशी त्यांची प्रतिमा होती. केतनचे राजकीय विरोधक व हितशत्रूही मान्य करायचे की, हा माणूस एक दिवस फोंड्याचा आमदार होईल. कुंभार जसा मातीला आकार देतो, त्या पद्धतीने कमी वयातच भाटीकर यांनी स्वतःच स्वतःच्या जीवनाला आकार दिला होता. 

आर्थिकदृष्ट्या भाटीकर प्रबळ नव्हते. तरी देखील हाती आलेला पैसा त्यांनी सामाजिक कामासाठीच खर्च केला हे त्यांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरले. फोंडा विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची पूर्ण क्षमता असलेला हा तरुण दुर्दैवी ठरला. सर्पदंशाने शुक्रवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. ही बातमी पूर्ण गोव्यातील लोकांची झोप उडविणारी ठरली. अरेरे, फार वाईट झाले अशी प्रतिक्रिया प्रत्येक गोमंतकीयाने दिली. भाटीकर यांना कधीच न भेटलेले व न ओळखणारे लोक देखील कळवळले. कारण ते समाजासाठी काही तरी चांगले सातत्याने करत होते याची जाणीव लोकांना होती. 

'पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा' हेच खरे. भाटीकर यांचा मृत्यू अशा प्रकारे अचानक होईल, असे कुणालाच वाटले नव्हते. वयाची पन्नाशी देखील न गाठता भाटीकर यांनी जगातून एक्झिट घेतली. काळजाचा ठाव घेणारे हे दुःख अनेकांचे डोळे ओले करून गेले. डॉक्टर भाटीकर यांना 'पीपल्स मेन' असे अनेकजण म्हणायचे आणि ते पूर्णपणे खरेच आहे. कोविड संकटकाळात अनेकजण घरातून बाहेर येत नव्हते. मात्र, भाटीकर धाडसाने लोकांच्या मदतीसाठी सगळीकडे फिरले.

त्यांनी फोंड्यातील अनेकांना त्या काळी मदतीचा हात दिला होता. देवदूताप्रमाणे काही जणांच्या मदतीला जात प्राणही वाचविले होते. लोकांचे आशीर्वाद त्यांना त्यावेळी मिळाले होतेच. दोतोर रुग्णवाहिका हवी आहे, असे सांगितल्यानंतर लगेच ते रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यायचे. कुणाच्या घरी मरण झाले आहे असे सांगितले तर शववाहिका व अन्य साहित्य पुरवायचे. 

भाटीकर आमदार होऊ शकले नाहीत तरी एखाद्या आमदारापेक्षाही जास्त सक्रिय राहण्याचे कसब त्यांनी दाखविले होते. त्यातूनच अनेकांची मने त्यांनी जिंकली होती. एकेकाळचे बलाढ्य नेते स्वर्गीय रवी नाईक यांना राजकीयदृष्ट्या टक्कर देत ते पुढे आले होते. वर्ष २०२२ च्या विधानसभा निवडणुकीवेळी ते अवघ्या ७० मतांनी पराभूत होते. रवी नाईक हे त्यावेळी कसेबसे जिंकले होते हे भाजप देखील मान्य करतो. काँग्रेस पक्षातून रवी भाजपमध्ये आले होते. त्यावेळी अनेकांना वाटले होते की, रवी हे आता राजकीयदृष्ट्या अधिक सुरक्षित झाले आहेत. 

कारण त्यांना फोंड्यातील काही (मुस्लीम वगैरे) काँग्रेस मर्थकांची व भाजपचीही मते मिळतील व पात्रांव आरामात जिंकून येतील. मात्र, प्रत्यक्षात स्थिती वेगळी आली. पारंपरिक लोकसमजाला केतन भाटीकर यांनी आपल्या कष्टाने व धडाडीने जोरदार तडा दिला होता. ७० मतांनी रवी विजयी झाले नसते तर केतन त्यावेळीच आमदार झाले असते. भाटीकर त्यावेळी मगो पक्षाच्या तिकिटावर लढले होते. फोंड्यात सुरुवातीला मगो पक्षाचे काम त्यांनीच खूप वाढविले होते हेही मान्य करावे लागेल. 

विद्यमान वीजमंत्री सुदिन ढवळीकर हे केतनचे राजकीय गुरू. केतननी मगो पक्ष सोडल्यानंतरही ढवळीकर व भाटीकर यांच्यात वैर निर्माण झाले नव्हते. सुरुवातीच्या काळात भाटीकर यांना राजकीयदृष्ट्या प्रोत्साहन देण्याचे काम ढवळीकरांनीच केले होते. राजकारण करताना खर्चही येत असतो. ढवळीकर हे त्याबाबतही भाटीकर यांना प्रारंभी मदतरूप ठरले होते. 

भाटीकर यांचे मध्यंतरीच्या काळात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशीही चांगले संबंध निर्माण झाले होते. फोंड्यात गेल्यानंतर भाटीकर यांनाही मुख्यमंत्री भेटायचे. रवी नाईक यांच्या निधनानंतर भाटीकर यांनी फोंड्यातील आपले बस्तान आणखी मजबूत केले होते. विधानसभेची फोंड्यातील पोटनिवडणूक भाटीकरच जिंकतील असे चित्र सुरुवातीला निर्माण झाले होते. सर्व बाजूंनी तशीच चर्चा होती; पण काहीजण न्यायालयात गेले. पोटनिवडणुकीचा माहोल असतानाच न्यायालयाच्या आदेशावरून निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक रद्द करून टाकली. 

भाटीकर यांच्यासाठीही तो धक्का ठरला होता. भाटीकर यांच्यासह काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते त्यावेळी खूप दुखावले होते; मात्र तो विषय पूर्णपणे वेगळा आहे. भाटीकर यांचे कालचे निधन हे सर्व अर्थानी धक्कादायक आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.

English
हिंदी सारांश
Web Title : Goa mourns sudden death of Ketan Bhatikar, politics in shock.

Web Summary : Ketan Bhatikar's sudden demise due to snakebite shocked Goa. A self-made politician, he was known for social work and nearly won the 2022 election. His death leaves a void in Ponda's political landscape.
टॅग्स :गोवाराजकारण