Daily Top 2Weekly Top 5

मनोज आणि वीरेश समर्थक आमने-सामने; 'आरजी'मधील वादाचा सोशल मीडियात भडका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 12:49 IST

इतकेच नव्हे तर त्यांना पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनीही सोशल मीडियावरून अनफॉलो केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : रिव्होल्यूशनरी गोवन्स (आरजी) पक्षात अंतर्गत वाद निर्माण झाल्याच्या चर्चा सुरू असताना मंगळवारी पक्षाचे नेते मनोज परब यांनी सोशल मीडियावरून पक्षविरोधी कारवाई करणाऱ्यांच्या नावांची यादीच जाहीर केली. त्यामुळे पक्षांतर्गत सुरू असलेला वाद आता चव्हाट्यावर आला. दुसरीकडे आपण व पक्षाचे नेते मनोज परब यांच्यात कुठलाही वाद नाही, असे जाहीरपणे सांगणाऱ्या पक्षाचे एकमेव आमदार वीरेश बोरकर यांच्याकडून पक्षाने स्पष्टीकरण मागितले आहे. इतकेच नव्हे तर त्यांना पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनीही सोशल मीडियावरून अनफॉलो केले आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर मनोज परब यांनी एकामागोमाग एक पोस्ट टाकत भावना मांडल्या. पक्षविरोधी काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या नावांचा उल्लेख करत त्यांना समोरासमोर येण्याचे आव्हानही दिले. सोशल मीडियावर मनोज परब विरुद्ध वीरेश यांच्या कार्यकर्त्यांचा गट आमने सामने आल्याचे दिसले.

दुसरीकडे पक्षाचे नेते मनोज परब व आमदार वीरेश बोरकर यांच्यात मतभेद नाहीत, असे पक्षाचे नेते अजय खोलकर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. मात्र, मनोज यांनी मंगळवारी सकाळपासून सोशल मीडिया पोस्टवर पक्षविरोधी कारवाईच्या घटनांचा उल्लेख करत काहीजणांची नावे जाहीर केली. त्यामध्ये वीरेश यांच्या बहुसंख्य समर्थकांचा समावेश आहे. त्यावर आमदार वीरेश यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. त्यावरून पक्षात फूट पडल्याची चर्चा आहे.

दरम्यान, या प्रकाराबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना पक्षाचे नेते अजय खोलकर म्हणाले, 'पक्ष हा सर्वोच्च असून त्याविरोधात काम करणाऱ्यांवर कारवाई करणारच. आमदार वीरेश बोरकर व पक्षाचे नेते मनोज परब यांच्यात कुठलेही मतभेद नाहीत. मात्र वीरेश हेदेखील पक्षविरोधी काम करणाऱ्यांसोबत दिसून आल्याने त्यांच्याकडून याबाबत आम्ही स्पष्टीकरण मागितले आहे. 

आमदारांसह इतरांनाही पक्षाने तसे न करण्याचा सल्ला दिला होता. परंतु आल्मेदांसह हे सर्वजण सक्रिय राहिल्याने वीरेश यांच्यासह अन्य जणांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले आहे. पक्ष लवकरच आपली भूमिका जाहीर करेल.

खोलकर म्हणाले की, 'पक्षविरोधी काम करणाऱ्यांना नेते मनोज परब यांनी अनेकदा संधी दिली. मात्र त्यांच्यात कुठलीही सुधारणा झाली नाही. त्यामुळेच मनोज यांनी सोशल मीडियावरून त्यांची नावे जाहीर केली. यात काहीच चुकीचे नसून त्यांनी योग्य तेच केले.

अनेकांच्या नावांचा उल्लेख

परब यांनी आदित्य देसाई, मयुरेश साळगावकर, लिसिओ रॉनकॉन यांच्यासह अनेकांची नावे सोशल मीडिया पोस्टमध्ये घेतली आहेत. शिवाय आरजीच्या चिन्हावर 'सेंट लॉरेन्स' मतदारसंघातून जि. पं. निवडणूक जिंकणाऱ्या तृप्ती बकाल यांचेही थेट नाव घेत मनोज यांनी टीका केली आहे.

वीरेश यांना केले अनफॉलो

'आपणही वीरेश यांना सोशल मीडियावरून अनफॉलो केले आहे. पक्षाची शिस्त ही महत्त्वाची असून पक्ष हा नेहमीच सर्वोच्च राहणार आहे' असे अजय खोलकर यांनी स्पष्ट केले.

वीरेश धुरंदर : विश्वेश

या वादात उडीत घेत आरजीचे संस्थापक सदस्य विश्वेस नाईक यांनी, 'वीरेश तुम्ही चांगले खेळलात, खऱ्या अर्थाने धुरंदर ठरलात, योग्य नियोजन, एकाच फटक्यात सर्वांचा पर्दाफश केला' असा टोला लगावला. आमदार वीरेश बोरकर यांचा पूर्ण नामोल्लेख न करता त्यांनी केलेल्या या पोस्टची जोरदार चर्चा आहे.

मनोज यांच्या पोस्ट्स

माझ्या आईला रडवले, आता तांडव होणार
पावसाळ्यापूर्वीच स्वच्छता गरजेची असते
मी लहान खेळ खेळत नाही, चला खेळ खेळूया
पक्षाचे अध्यक्षपद हवे होते, तर सांगायचे. असेच काढून दिले असते
तारीख व वेळ तुम्ही ठरवा, मी थांबलोय
स्वार्थी, आक्रमक मनोजचा आता सामना करा

सांतआंद्रे मतदारसंघातील ज्युलियस आल्मेदा हा पक्षाचा सदस्य नाही. त्याने पक्षाला हानी पोहचवण्याचा प्रयत्न केला. पक्षाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत यावर चर्चा केल्यानंतर त्यांना नोटीस बजावली होती. परंतु त्यानंतरही आमदार वीरेश बोरकर व त्यांचे सहकारी लिसिओ रॉनकॉन व अन्य काहीजण त्याच्यासोबत दिसून आले. याबाबत वीरेश बोरकर यांच्यासह इतरांकडून पक्षाने स्पष्टीकरण मागितले आहे. - अजय खोलकर
 

English
हिंदी सारांश
Web Title : RG Party Internal Dispute Escalates: Manoj and Veeresh Supporters Clash

Web Summary : Revolutionary Goans (RG) party faces internal conflict as Manoj Parab publicly listed names of those acting against the party. The party has sought clarification from MLA Veeresh Borkar, following social media clashes. Ajay Kholkar stated the party will take action against dissenters, emphasizing party discipline and unity amidst the turmoil.
टॅग्स :गोवाराजकारण