Daily Top 2Weekly Top 5

केतन भाटीकर यांचे निधन; उमद्या नेत्याच्या अकाली एक्झिटमुळे राज्यभर हळहळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 12:30 IST

फोंड्यात हजारो शोकाकूल नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार; सर्पदंशामुळे मृत्यू, दांडेलीहून परतताना अनमोड घाटात घडली घटना 

लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा: राज्यातील समाजकारण व राजकारणात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवलेले काँग्रेसचे युवा नेते डॉ. केतन भाटीकर (वय ४१) यांचे गुरुवारी मध्यरात्री सर्पदंशाने निधन झाले. मित्राबरोबर ते दांडेली येथे काही कामानिमित्त गेले होते. तेथून परतताना ही घटना घडली. 

मध्यरात्री दीडच्या सुमारास सर्पदंश झाल्यानंतर त्यांना तातडीने पिळये-धारबांदोडा येथील आरोग्य केंद्रात आणण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. सव्वातीन ते साडेतीनच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर साईनगर-फोंडा येथील निवासस्थानी यांचे पार्थिव आणण्यात आले. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह शोकाकूल समर्थक, कार्यकर्त्याच्या उपस्थितीत अंत्ययात्रा काढण्यात आली. रात्री साडेसातच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

भाटीकर यांच्या सर्पदंशाने अकाली झालेल्या निधनाने फोंडा तालुक्यासह राज्यावर शोककळा पसरली. फोंडा येथील मुक्तिधामामध्ये सायंकाळी साडेसातच्या दरम्यान केतन यांचे वडील किर्तीकुमार प्रभू-भाटीकर यांनी मुखाग्नी दिला. केतन यांच्या पश्चात त्यांच्या आई, निवृत शिक्षिका कादंबरी भाटीकर, मोठा भाऊ, श्री कामाक्षी देवी होमिओपॅथिक कॉलेजचे सुपरिटेंडंट डॉ. कौतुक, वहिनी असा परिवार आहे.

फुरसे चावल्याने गमावला जीव

डॉ. केतन यांचा मृत्यू फुरसे हा अत्यंत विषारी साप चावल्याने झाला असे वैद्यकीय चाचणीतून आढळून आले. त्यांच्या उजव्या हातावर फुरशाने दोन वेळा चावा घेतल्याचे दिसले. सापाच्या दाताच्या खुणाही आढळल्या. भाटीकर यांच्या शरीरात विषाची मात्राही अधिक प्रमाणात होती. फुरसे सापाचे विष हृदयात गेल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तपासणीत आढळले. त्यांचे पोस्टमार्टम करण्यासाठी डॉक्टरांचे विशेष पथक नियुक्त करण्यात आले होते. गोमेकॉच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. आंद्रे फर्नाडिस यांचा त्यात सहभाग होता. मडगाव येथील जिल्हा इस्पितळात शवचिकित्सा करण्यात आली.

आमदारकीचे स्वप्न अधुरे

भाटीकर यांनी मगो पक्षाच्या माध्यमातून राजकीय कारकीर्द घडवली. त्यांनी सुरुवातीला २०१४ मध्ये गोवा सुरक्षा मंचच्या माध्यमातून पणजी विधानसभा निवडणूक लढवली. नंतर २०२२ मध्ये मगो पक्षाकडून भाजपचे नेते, रवी नाईक यांच्या विरोधात फोंडा विधानसभा निवडणूक लढवली. अवघ्या ७० मतांनी ते पराभूत झाले होते. फेब्रुवारी २०२६ मध्ये त्यांनी काँग्रेसकडून फोंडा पोटनिवडणूक लढवली. मात्र, ती रह झाली. त्यामुळे त्यांचे आमदार होण्याचे स्वप्न अधुरेच राहिले.

घटनाक्रम...

अनमोड घाटात...

या घटनेवेळी भाटीकर यांच्यासोबत असलेले मित्र सुशांत कवळेकर म्हणाले, दांडेलीत केतन यांचे एका मित्राकडे काम होते. ते आटोपेपर्यंत मी कारमध्येच बसून होतो. दांडेलीतून उशीरा, एकच्या सुमारास निघालो. तोपर्यंत जेवण केले नव्हते. वाटेत कुठेतरी धाब्यावर जेवता येईल, असे ठरवून गोव्याच्या दिशेने यायला निघालो. वाटेत केतन यांनी लघुशंका करण्यासाठी गाडी थांबवली. त्यांचदरम्यान, तेथील एका झाडीत असलेल्या सापाने त्यांना दंश केला.

खिशातून मोबाइल पडला अन्...

अनमोड घाटात थांबलेले डॉ. केतन हे जेव्हा खिशातून पडलेला मोबाइल घेण्यासाठी खाली वाकले. यादरम्यान, झुडूपात असलेल्या सापाने त्यांच्या उजव्या हातावर दोनदा दंश केला. केतन यांना साप चावल्याचे जाणवले.

पावसामुळे प्रवासात अडथळे

आपणाला सर्पदंश झाला हे लक्षात येताच डॉ. भाटीकर यांनी सुशांत यांना तातडीने गाडी गोव्याच्या दिशेने न्यायला सांगितली. त्यानुसार सुशांत हे भरधाव वेगात गोव्याच्या दिशेने यायला निघाले. वाटेत पावसामुळे अडथळे आले. यांदरम्यान केतन यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे सुशांत यांनी अॅम्ब्युलन्स मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, उशीर होऊ लागला. यांदरम्यान, १०८ रुग्णवाहिकेने त्यांना पिळये-धारबांदोडा येथील आरोग्य केंद्रात त्यांना दाखल करण्यात आले. दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. विष वेगाने पसरले पोस्टमार्टम अहवालानुसार सापाचे विष त्यांच्या शरीरात झपाट्याने पसरले. त्यांची प्रकृती बिघडली. विषाचा परिणाम वेगाने वाढल्याने त्यांचा मृत्यू झाला.

केतन भाटीकर यांच्या अकाली निधनाच्या वृत्ताने वैद्यकीय क्षेत्राची हानी झाली आहे. सेवाभावी वृत्ती, रुग्णांप्रती असलेली आत्मीयता, समाजासाठी योगदानामुळे त्यांनी अल्पावधीतच मोठा मान-सन्मान मिळवला होता. त्यांच्या निधनामुळे वैद्यकीय क्षेत्राने संवेदनशील व्यक्तिमत्त्व गमावले आहे. - डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

काँग्रेसचे युवा नेते, फिजिओथेरपिस्ट डॉ. केतन भाटीकर यांनी समाजसेवा, आरोग्यसेवा आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रांत आपल्या कार्याची छाप उमटवली होती. लोकांप्रती असलेली त्यांची बांधिलकी, सेवाभावी वृत्ती आणि प्रामाणिक कार्यपद्धतीमुळे ते लोकप्रिय व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे असे अकाली जाणे दुःखदायक आहे. - राहुल गांधी, राष्ट्रीय नेते, काँग्रेस

मान्यवरांनी घेतले पार्थिवाचे दर्शन

दुपारी अडीचच्या दरम्यान केतन यांचे पार्थिव फोंड्यात साईनगर येथे आणण्यात आले. यावेळी त्यांच्या समर्थक, कार्यकर्त्यांनी आक्रोश केला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, मंत्री दिगंबर कामत, सुदिन ढवळीकर, सुभाष शिरोडकर, खासदार विरियातो फर्नांडिस, आमदार विजय सरदेसाई, गोविंद गावडे, जीत आरोलकर, पेमेंद्र शेट, मगो प्रदेशाध्यक्ष दीपक ढवळीकर, आपचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी मर्लिन, गोवा प्रदेश प्रमुख वाल्मिकी नाईक, फोंड्याचे नगराध्यक्ष वीरेंद्र ढवळीकर, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर, रितेश नाईक, रॉय नाईक, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आदींनी अंत्यदर्शन घेतले.
 

English
हिंदी सारांश
Web Title : Ketan Bhatikar's Death: Prominent Leader's Untimely Exit Causes Grief

Web Summary : Congress leader Ketan Bhatikar (41) died of snakebite in Dandeli. Despite treatment, he passed away. His political career was promising, having contested elections. His death brought condolences from political figures, highlighting his impact on society and politics.
टॅग्स :गोवाराजकारण